मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आता ‘आमचो दोतोर’!

नवे अॅप सुरू : केंद्र, राज्याच्या योजनांची माहितीही मिळवता येणार


12 hours ago
मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आता ‘आमचो दोतोर’!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोमंतकीय जनतेला थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संपर्कात राहता यावे, यासाठी सरकारने ‘आमचो दोतोर’ हे नवे अॅप सुरू केले आहे. हे अॅप स्वत:च्या मोबाईलवर डाऊनलोड करून जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, नोकरीच्या संधी, तसेच इतर माहिती मिळवता येणार आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सातत्याने जनतेच्या संपर्कात असतात. ग्रामीण भागातील जनतेचे विविध प्रश्न तत्काळ सुटावेत, यासाठी काही महिन्यांपूर्वी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला होता. त्यानंतर दूरदर्शनवर ‘हॅलो गोंयकार’ हा कार्यक्रम दर शुक्रवारी आयोजित करण्यात येत होता. या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री डॉ. सावंत थेट जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून घेऊन त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना देत होते. हा कार्यक्रम सर्वच सरकारी खात्यांचे अधिकारी पाहत होते. त्यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून त्वरित हालचाली सुरू होत होत्या. अल्पावधीतच या कार्यक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता.
दरम्यान, ‘हॅलो गोंयकार’नंतर आता जनतेला थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आणण्यासाठी ‘आमचो दोतोर’ नावाने नवे अॅप सुरू करण्यात आले आहे. हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून नागरिकांना थेट मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या संपर्कात राहता येणार आहे. या अॅपद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळवता येणार आहे. याशिवाय नोकरीच्या संधींसह राज्यासंदर्भातील महत्त्वाची माहितीही या अॅपद्वारे नागरिकांना मिळवता येणार आहे.
योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीच अॅप
ग्रामीण आणि शहरी भागांत राहणाऱ्या गोमंतकीय जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर मात करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवून ग्रामीण भागातील जनतेला त्यांचा लाभ मिळवून देण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठीच या अॅपच्या माध्यमातून अशा योजनांची माहिती देण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.