पर्यावरणीय मान्यता मिळाल्याने रेती उपशाचा मार्ग मोकळा

मांडवी, जुवारी नद्यांतील १२ ठिकाणी उपसा करण्यास हिरवा कंदील


04th February, 12:19 am
पर्यावरणीय मान्यता मिळाल्याने रेती उपशाचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मांडवी आणि जुवारी नदीत एकूण १२ ठिकाणी रेती उपसा करण्याला राज्य पर्यावरण परिणाम मूल्यमापन प्राधिकरणाने (एसईआयएए) पर्यावरणीय मान्यता (ईसी) दिल्याने रेती उपसा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेती काढण्यापूर्वी खाण खात्याने गोवा किनारी व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (जीसीझेडएमए) मान्यता घ्यावी लागेल. पर्यावरणीय दाखल्याला एक वर्षाची मुदत आहे.
मांडवी नदीत ७, तर जुवारी नदीत ५ ठिकाणी रेती उपसा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मांडवी नदीत बेतकी-फोंडा, खांडोळा, सावई वेरे, वळवई, एरकय कोकोण, गोवा शिपबिल्डिंग क्षेत्र खांडोळा, बेतकी या भागात रेती उपसा करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. बेतकी येथे दोन ठिकाणी रेती उपसा करता येऊ शकते. जुवारी नदीत बोरी, काकाझान, पंचवाडी, शिरोडा येथे रेती उपसा करण्याला मंजुरी दिली आहे. पंचवाडी येथे दोन‌ ठिकाणी रेती उपसा करता येईल.
रेती उपसासाठी परवाने देण्यासाठी इच्छुकांकडून खाण खात्याने अर्ज घेऊन ठेवले होते. मांडवी आणि जुवारी नदीत मिळून १८७ अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी करून पात्र असलेल्यांना रेती उपसा करण्याचा परवाना दिला जाईल. जुवारी नदीत रेती काढण्यासाठी इच्छुकांचे कमी अर्ज आले असल्याने खाण खात्यान परवान्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली होती. मुदत वाढवल्यानंतर १४ अर्ज आले. एका परवानाधारकाला वर्षाला १००० क्युबिक मीटरपर्यंत रेती काढता येणार आहे. सकाळी ६ ते सायं. ६ पर्यंतच रेती उपसा करता येईल. तसेच पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत रेती उपसा करता येणार नाही. गैरव्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी कायद्याप्रमाणे फिरत्या पथकाची व्यवस्था करावी लागणार आहे.
रेती काढण्याचे परवाने नसल्याने राज्यात गोव्याबाहेरून रेती आणावी लागत होती. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक तसेच सामान्य लोकांना फटका बसत होता. वाहतूक खर्चामुळे रेतीसाठी खूपच जास्त पैसे मोजावे लागत होते.