नागपूरमध्ये आज पहिला सामना : रोहित, विराट, श्रेयस, राहुलचे पुनरागमन
नागपूर : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सराव असणार आहे. भारत आणि इंग्लंड ६ (गुरुवार) ते १२ फेब्रुवारी दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी होणाऱ्या या मालिकेचा दोन्ही संघाना फायदा होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियामध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यावर असतील. गेल्या काही कसोटी मालिकेत या दोन्ही खेळाडूंची कामगिरी फारशी चांगली नव्हती.
टी-२० मालिकेत भारताकडून ४-१ अशा पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर वनडेमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत मैदानात उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल सारखे वरिष्ठ खेळाडू ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणार असल्याने यजमान संघात मोठे बदल पाहायला मिळतील. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठीही ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने श्रीलंकेत फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. या मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, इंग्लंडच्या वनडे आणि टी-२० संघामध्ये फारसा फरक नाही. सलामीवीर म्हणून बेन डकेट आणि फिल सॉल्टची जोडीच मैदानात दिसणार आहे. हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन यांचीही संघात निवड झाली आहे. जो रूट फक्त तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. या व्यतिरिक्त जेकब बेथल हा देखील संघाचा भाग आहे. ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद हे वेगवान गोलंदाज संघाचा भाग आहेत. आदिल रशीद हा फिरकीपटू म्हणून संघात आहे.
टी-२० मालिका गमावल्यानंतर आता एकदिवसीय मालिकाही इंग्लंडसाठी सोपी नसणार आहे. या फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या संघाने ४१ वर्षांपासून भारतात एकही वनडे मालिका जिंकलेली नाही. इंग्लंडने भारतात शेवटची वनडे मालिका १९८४ मध्ये जिंकली होती. शेवटची मालिका २०२१ मध्ये झाली होती, जी भारतीय संघाने २-१ ने जिंकली होती.
भारताचे ५८ सामन्यांत विजय
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १०७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ५८ सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले असून तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.
वरुण चक्रवर्तीची भारतीय संघात एन्ट्री
टी-२० मालिकेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलेल्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची संघात एन्ट्री झाली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली. वरुण चक्रवर्ती इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडचे एकूण १४ गडी बाद केले होते. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याला एकदिवसीय संघातही स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंड संघात विस्फोटक फलंदाजाला संधी
या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने एक दिवस आधीच आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने विस्फोटक फलंदाजाला वनडे संघात संधी दिली असून तो प्लेईंग इलेव्हनचा भाग असणार आहे. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २०२४ मध्ये तुफान फॉर्मात असलेल्या जो रूटला स्थान मिळाले आहे. जो ४५२ दिवसांनंतर एकदिवसीय सामना खेळताना दिसणार आहे. रूटने शेवटचा एकदिवसीय सामना भारतात झालेल्या विश्वचषकात खेळला होता.
संभाव्य संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन :
बेन डकेट, फिल सॉल्ट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टन, जॅकब बेथल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.