कन्कशन सबस्टिट्यूटवरून पेटला वाद

अनेक इंग्लंडच्या माजी खेळाडूंची टीका : पीटरसनकडून राणाची पाठराखण

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st February, 11:33 pm
कन्कशन सबस्टिट्यूटवरून पेटला वाद

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामन्यात हर्षित राणाला कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून खेळण्याची संधी मिळाली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पदार्पण होते. भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात अष्टपैलू शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागला, ज्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला. त्याने मैदानात सामन्यात कलाटणी दिली आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे कन्कशन सबस्टिट्यूटवरून नवा वाद पेटला आहे.

हर्षित राणा हा भारताच्या विजयाच्या नायकांपैकी एक होता. तो १२व्या षटकात गोलंदाजी करायला आला आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर त्याने स्फोटक फलंदाज जेकब बेथेललाही बाद केले. हॅरी ब्रूकने एका वेळी राणाच्या लागोपाठ तीन चेंडूंवर १६ धावा निश्चित केल्या होत्या, पण त्याशिवाय त्याने फलंदाजांना एकही संधी दिली नाही. राणाने १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जिमी ओव्हरटनला बाद करून भारताचा विजय निश्चित केला. त्याने ४ षटकात ३३ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने एक्सवर लिहिले की, अर्धवेळ गोलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची जागा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजी कशी घेऊ शकतो?’ त्याचबरोबर इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक म्हणाला, शिवम दुबेच्या जागी त्यांनी हर्षित राणाला कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून कशी परवानगी दिली? हे मला समजत नाही.’ शिवम दुबे हा टी-२० विश्वचषक २०२४ च्या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. या काळात त्याने अमेरिकेविरुद्ध फक्त एकच षटक टाकले होते. आयपीएल २०२४ च्या १४ सामन्यांतही त्याने फक्त एकच षटक टाकले होते. हर्षित राणाच्या नावावर आतापर्यंत २५ टी-२० सामन्यांमध्ये केवळ दोन धावा आहेत. या कालावधीत त्याने २८ विकेट्स घेतल्या आहेत. दुबेने १५३ सामन्यांच्या टी-२० कारकिर्दीत १९१ षटके टाकली आहेत. राणाने २५ सामन्यात ७४ षटके गोलंदाजी केली आहे.
कन्कशन सबस्टिट्यूटबद्दल आयसीसीचा नियम असा आहे की, फक्त ‘लाईक टू लाईक’ रिप्लेसमेंट उपलब्ध असतो. म्हणजे ज्या प्रकारचा खेळाडू बाहेर गेला आहे, तशाच प्रकारचा खेळाडू संघात त्याची जागा घेऊ शकतो. शिवम दुबे हा अष्टपैलू फलंदाज आहे, जो अधूनमधून गोलंदाजी करतो. दुसरीकडे, हर्षित राणा वेगवान गोलंदाज आहे. याच कारणामुळे भारताच्या विजयानंतर वाद सुरू झाला आहे.
पुणे टी २० सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर पत्रकार परिषद घेण्यासाठी आली. यादरम्यान बोलताना बटलर म्हणाला, ही लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट नव्हती आणि या निर्णयाशी सहमत नाही. शिवम दुबे १२५ किमी प्रति तासपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत आहे का किंवा हर्षितने खरोखरच त्याच्या फलंदाजीत सुधारणा केली आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही खरेच हा सामना जिंकणे अपेक्षित होते. पण आम्ही या निर्णयाशी सहमत नाही.
बटलर निर्णयाशी असहमत
इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलरने या कन्कशन सबस्टीट्यूटवर मोठे वक्तव्य केले आहे. जोस बटलर म्हणाला की, तो पुणे टी-२० मध्ये वापरल्या गेलेल्या कनक्शन सबस्टीट्यूटशी तो सहमत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार यात चूक झाली असून त्याने थेट मॅच रेफ्रींच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
बटलरच्या मते सामनाधिकारींचा निर्णय योग्य नव्हता. खरे तर, भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला. मैदानाबाहेर गेल्यावर त्याने चक्कर आल्याचे सांगितले. यानंतर टीम इंडियाने त्याच्या जागी कनक्शन सबस्टीट्यूट खेळवण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने दुबेच्या जागी हर्षित राणाला घेतले. मॅच रेफ्रीने देखीय या निर्णयाला परवानगी दिली.
केविन पीटरसन सामन्यानंतर म्हणाला, या सगळ्यात हर्षित राणाची चूक नाही. त्याची गोलंदाजी चमकदार होती. मला वाटते, त्याने आपले कौशल्य खूप चांगल्या प्रकारे दाखवले. त्याने ज्या पद्धतीने काही फलंदाजांचे मूल्यांकन केले, ते चमकदार आहे. त्याने ज्या पद्धतीने परिस्थितीचे आकलन केले आणि गोलंदाजी ते खरंच खास होते. अनेक प्रसंगी त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित करत सामन्याला कलाटणी देत भारताला विजयाकडे नेले.
निर्णय मॅच रेफ्रींचा : मॉर्केल
चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळाल्यानंतर मॉर्ने मॉर्केलने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताचा डाव संपल्यानंतर शिवम दुबे ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. तेव्हा त्याने सांगितले की त्याचे थोडे दुखत आहे. यानंतर आम्ही याबाबत मॅच रेफरीला सांगितले आणि बदली खेळाडू म्हणून एक नाव पुढे करण्यात आले. त्यानंतर, मॅच रेफरी अवलंबून असते की मान्यता द्यायची की नाही. मात्र, रेफ्रीने मान्यता दिली. हा निर्णय झाला, तेव्हा हर्षित राणा डिनर करत होता. अशा परिस्थितीत, आम्हाला शक्य तितक्या लवकर त्याला मैदानात उतरवून गोलंदाजीसाठी तयार करावे लागले.
काय आहे आयसीसीचा नियम?
नियम १.२.७.७ नुसार कोणत्याही कन्कशन रिप्लेसमेंट विनंतीसंदर्भात आयसीसी मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम असेल आणि कोणत्याही संघाला अपील करण्याचा अधिकार नसेल.

आयसीसीच्या खेळण्याच्या नियम १.२.७.३ कनक्शन झाल्यास सबस्टिट्यूटच्या नियमानुसाल सामन्यादरम्यान कन्कशन झालेल्या खेळाडूच्या जागी येणारा बदली खेळाडू जर त्याच्यासारखाच असेल आणि त्याच्या समावेशामुळे त्याच्या संघाला उर्वरित कालावधीसाठी जास्त फायदा होणार नाही, तर आयसीसी मॅच रेफ्रीने सामान्यत: कन्कशन रिप्लेसमेंट रिक्वेस्टला मान्यता दिली पाहिजे.
२०२० मध्येही भारताला सारख्याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात युझवेंद्र चहल रवींद्र जडेजाचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि तीन विकेट्स घेत तो सामनावीर ठरला.
हर्षित राणाने सामना फिरवला
शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर त्याच्या जागी कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून हर्षित राणाला खेळण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी करताना तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, जे भारतीय संघाच्या विजयासाठी मौल्यवान योगदान ठरले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळलेला हर्षित राणा १२व्या षटकात गोलंदाजी करायला आला आणि त्याने झटपट प्रभाव पाडला. त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला नऊ धावांवर बाद केले. यानंतर त्याने जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन यांच्या विकेट घेतल्या. त्याने सामन्यात चार षटकात ३३ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा