आंतरप्रसारमाध्यम क्रिकेट स्पर्धेत प्रुडंट मीडियाला उपविजेतेपद

टाईम्स ऑफ इंडिया विजेता : गोवा क्रीडा पत्रकार संघटनेचे गोवा क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आयोजन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
31st January, 11:57 pm
आंतरप्रसारमाध्यम क्रिकेट स्पर्धेत प्रुडंट मीडियाला उपविजेतेपद

उपविजेता प्रुडंट मीडियाचा संघ.

पणजी  : आंतरप्रसारमाध्यम सीझनबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रुडंट मीडियाने उपविजेतेपद पटकावले. टाईम्स ऑफ इंडिया प्रुडंट मीडियाचा ७ गडी व १५ चेंडू राखून पराभव करून विजेता ठरला. गोवा क्रीडा पत्रकार संघटनेने (एसजेएजी) गोवा क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. 

प्रत्येकी १५ षटकांच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रुडंट मीडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांनी निर्धारित १५ षटकांत ७ गडी गमावून ९१ धावा केल्या. प्रमुख फलंदाज शैलेश झांट्ये लवकर बाद झाल्यामुळे त्यांना सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. मधल्या फळीत पवन झांट्ये (२४) व लक्ष्मण गवंडी (२१) यांनी संघाच्या डावाला उभारी दिली. अष्टपैलू अविनाश जोशी जायबंदी झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. टाईम्स ऑफ इंडियाकडून फ्लावियो लोपिस याने १३ धावांत २, प्रसाद पाटीलने १६ धावांत २ तर अखिल पिल्लई व राजतिलक नाईक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.  प्रत्युत्तरादाखल खेळताना टाईम्स ऑफ इंडियाच्या सरदार राऊत (११) व प्रसाद पाटील (३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी करताना विजयाचा भक्कम पाया रचला. अखिल पिल्लई १७ धावांवर व रंजन डेका ११ धावांवर नाबाद राहिला. टाईम्स ऑफ इंडियाने १२.३ षटकांत केवळ ३ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. प्रुडंटचा डावखुरा जलदगती गोलंदाज अविनाश जोशी याच्या दुखापतीचा लाभ प्रतिस्पर्धी टाईम्स ऑफ इंडिया संघाला झाला. 

बक्षीस वितरण समारंभाला समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके, टाईम्स ऑफ इंडियाचे निवासी संपादक राजेश मेनन, प्रुडंट नेटवर्कचे संपादकीय संचालक प्रमोद आचार्य, गोवा क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश गावकर आदी उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे पंच म्हणून रवी बर्वे व सूरज गोवेकर यांनी जबाबदारी सांभाळली. धावलेखक म्हणून रामदास साळकर यांनी काम पाहिले.

वैयक्तिक बक्षिसे

शिस्तबद्ध संघ : गोमन्तक, अंतिम सामन्याचा सामनावीर : प्रसाद पाटील (टाईम्स ऑफ इंडिया), सर्वोत्तम गोलंदाज  : राजतिलक नाईक (टाईम्स ऑफ इंडिया), स्पर्धावीर : प्रसाद पाटील (टाईम्स ऑफ इंडिया), सर्वोत्तम यष्टीरक्षक : अभिजीत जाधव (प्रुडंट मीडिया), सर्वोत्तम फलंदाज : अखिल पिल्लई (टाईम्स ऑफ इंडिया), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : शैलेश झांट्ये (प्रुडंट मीडिया).