महाराष्ट्राच्या प्रतिस्पर्ध्यावर मात : गोव्याच्या पदकांचे खाते उघडले
पणजी : ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला स्क्वॉशमध्ये गोव्यासाठी आकांशा साळुंखेने आनंदाची बातमी दिली. तिने सुवर्णपदक पटकावत स्पर्धेत गोव्याला पहिले पदक मिळवून दिले. याआधी २०२३ मध्ये गोव्यात झालेल्या ३७ व्या क्रीडा स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते.
स्क्वॅशमध्ये गतविजेत्या आकांक्षाने उपांत्य फेरीत पूजा रघु (तामिळनाडू) हिचा ३-० असा पराभव करून प्रत्येक फेरीत आरामात विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत आकांक्षाची लढत महाराष्ट्राच्या अंजली सेमवालशी झाली. अंजलीने तामिळनाडूच्या रथिका सीलनचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात आकांक्षा साळुंखेने महाराष्ट्राच्या अंजली सेमवालचा ११-६, ११-५, ११-४ असा पराभव करत सुर्वणपदकाला गवसणी घातली. संपूर्ण स्पर्धेत आकांक्षाने एकही गेम गमावला नाही हे विशेष.
गोवा गुणतक्त्यात २३व्या स्थानी
या विजयामुळे गोव्याने या स्पर्धेतील आपल्या पदकांचे खाते उघडले असून आता गोवा गुणतक्त्यात एका सुवर्णपदकासह २३ व्या क्रमांकावर आहे. कर्नाटक २२ सुवर्ण, १० रौप्य व १० कांस्यसह ४२ पदके मिळवत पहिल्या स्थानावर, सेनादल १९ सुवर्ण, १० रौप्य, ९ कांस्यसह ३८ पदके मिळवत दुसऱ्या तर महाराष्ट्र १४ सुवर्ण, २६ रौप्य व २० कांस्यपदकांसह ६० पदके मिळवत गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहे.
आकांक्षाने मानले सर्वांचे आभार
विजयानंतर आकांक्षाने सर्वांचे आभार मानले. तिने म्हटले, दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आभारी आहे! गोवा असोसिएशन ऑफ स्क्वॉश आणि गोवा टीमच्या सतत पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. यावेळी तिने आपले प्रशिक्षकांचेही आभार मानले. २६ वर्षीय आकांक्षा जागतिक स्क्वॉश क्रमवारीत फेब्रुवारीच्या मानांकनानुसार ६५व्या क्रमांकावर आहे.
स्पर्धेतील गोव्याचे इतर निकाल
पुरुषांच्या ८०० मी फ्रीस्टाईलमध्ये गोव्याचे आर्यन शर्मा व अहील शेख अनुक्रमे १६ व १७व्या स्थानावर राहिले. गोव्याची आघाडीची जलतरणपटू श्रुंगी बांदेकर महिलांच्या २०० मीटर मेडलीमध्ये चौथ्या स्थानावर राहिली.