भारताच्या लेकी १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

उपांत्य फेरीत इंग्लंडचा उडवला धुव्वा; ५ षटके राखून मिळवला विजय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
31st January, 11:59 pm
भारताच्या लेकी १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

क्वालालंपूर : भारताच्या अंडर-१९ महिला संघाने मलेशियामध्ये खेळवल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला. भारताच्या फिरकीपटू गोलंदाजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला तर संघाच्या सलामीवीरांनी संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.इंग्लंडच्या महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी हा निर्णय अगदी योग्य ठरवला. इंग्लंडची सलामीवीरांनी सुरूवातीला चौकार-षटकांराचा पाऊस पाडला. पण भारताची फिरकीपटू पारूनिका हिने गोलंदाजीला येताच भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पारूनिका लागोपाठ दोन विकेट्स घेत इंग्लंडला धक्के दिले.
गट फेरीत अजेय राहिल्यानंतर भारताने उपांत्य फेरीत इंग्लिश फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात कहर केला. भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ २० षटकांत केवळ ११३ धावाच करू शकला. भारतीय संघाने ५ षटके शिल्लक ठेवत ११७ धावा करत विजय मिळवला. भारतीय गोलंदाज या सामन्यात किती वरचढ होते याचा अंदाज विकेट्सवरून येतो. आठ पैकी सहा फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी क्लीन बोल्ड केले तर दोन फलंदाज झेलबाद झाले.
इंग्लंडने दिलेल्या ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेहमीप्रमाणे भारताच्या सलामी जोडीने चांगली सुरूवात करून दिली. मागील सामन्यातील शतकवीर गोंगाडी त्रिशा बाद झाल्याने भारताला धक्का बसला. पण तिने २९ चेंडूत ५ चौकारांसह ३५ धावांची शानदार खेळी केली. तर यानंतर जी कमालिनीने अर्धशतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला. कमालिनीने ५- चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा केल्या. तर सानिका चाळकेने ११ धावा केल्या.
यानंतर परिन आणि नोग्रोव्ह चांगली भागीदारी रचत असताना आयुषी शुक्लाने परिनला क्लीन बोल्ड करत भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडची कर्णधारही बाद झाली आणि इंग्लंडचा डाव यानंतर पत्त्यांसारखा कोसळला. वैष्णवी शर्माने १६ व्या षटकात ३ विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर टाकले. तर त्रिशानेही १ विकेट घेतली.
अंतिम सामन्यात द. आफ्रिकेशी भिडणार
भारतीय संघ १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामना खेळणार आहे. या स्पर्धेत दोन उपांत्य फेरीचे सामने झाले. पहिल्या फेरीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर दुसऱ्या फेरीत भारताने इंग्लंडला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येणार आहेत. हा सामना रविवार, दि. २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता संघ आहे. हा अंतिम सामना बायुम्मास ओव्हल क्वालालंपूर येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १२ वाजता खेळवला जाईल.
पूर्ण स्पर्धेत अजिंक्य
भारतीय संघाने आतापर्यंत महिलांच्या अंडर-१९ टी-२० वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी सर्व सहा सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये गट टप्प्यातील सामने सुपर सिक्स फेरी आणि उपांत्य फेरीतील सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला होता. यानंतर यजमान मलेशियाचा १० गडी राखून पराभव केला. टीम इंडियाविरुद्ध श्रीलंकेचाही ६० धावांनी पराभव झाला. तर भारताची सलामीवीर त्रिशा गोंगाडीच्या शतकाच्या जोरावर भारताने स्कॉटलंडविरूद्ध १५० धावांनी मोठा विजय नोंदवला. तर उपांत्य फेरीत इंग्लंडचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. तर अंतिम फेरीत पोहोचलेला दक्षिण आफ्रिकेचा संघही या स्पर्धेत एकही सामन्यात पराभूत झालेला नाही.


वैष्णवीचा विश्वविक्रम
आयसीसी महिला १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकात फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेऊन एक मोठी कामगिरी केली. भारताला अंतिम फेरीत पोहोचवण्यात वैष्णवीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि तिच्या फिरकी गोलंदाजीने ती फलंदाजांसाठी एक दुःस्वप्न बनली आहे.भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ९ विकेट्सने पराभव केला. उपांत्य फेरीत वैष्णवीने ३ विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत वैष्णवीने हॅटट्रिकही घेतली आहे.स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मॅगी क्लार्कच्या नावावर होता, जिने ५ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या. वैष्णवी शर्मा आता मॅगीपेक्षा पुढे गेली आहे. भारतीय फिरकी गोलंदाजाने दुसऱ्या आवृत्तीतच मॅगीला मागे टाकले. वैष्णवीने ५ सामन्यांमध्ये ३.४० च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत.