मुख्यालय अधीक्षकांचा दणका : बदलीनंतरही २३० जण जुन्याच ठिकाणी
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार गोवा पोलीस खात्याने २०२४ मध्ये तीन वेगवेगळे आदेश जारी करून पोलीस उपनिरीक्षक ते काॅन्स्टेबल या पदांवरील १,३८४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली केली होती. यातील सुमारे २३० जण अद्याप नवीन जागी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना नवीन जागेवर रुजू झाल्यानंतरच फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळणार आहे, असा बिनतारी संदेश पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी जारी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस खात्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या २१ फेब्रुवारी २०२४ रोजी बदलीचे आदेश जारी केले होते. यातील अनेक कर्मचारी अद्यापही त्याच ठिकाणी सेवारत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी तर नवीन ठिकाणी रुजू न होताच, त्याच ठिकाणी पुन्हा बदली करून घेतली आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी राजकीय वजन वापरून आपल्या सोयीनुसार बदली करून घेण्यासाठी संबंधित राजकीय नेत्याकडे विनंती केली होती. परिणामस्वरूप पोलीस खात्याला जानेवारीच्या अखेरीस मोठ्या संख्येने बदली करण्याचे अर्ज आले होते. याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. यापूर्वी बदली झालेले किती कर्मचारी नवीन ठिकाणी रुजू झाले आहेत, याची यादीच त्यांनी मागवली.
२१ फेब्रुवारी २०२४ रोजी २६४ जणांची, ११ जुलै २०२४ रोजी ४१६ जणांची आणि २७ सप्टेंबर २०२४ रोजी ७०४ जणांची, असे एकूण १,३८४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची बदली करण्यात आली होती. यापैकी सुमारे २३० जण अद्यापही त्यांच्या जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे समोर आले. दरम्यान, पोलीस खात्याने दर वेळी बिनतारी संदेश जारी करून त्यांना नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही सुमारे २३० जण नवीन ठिकाणी रुजू झाले नसल्याचे समोर आले.
याची गंभीर दखल घेऊन पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी, पूर्वीच्या आदेशानुसार बदली झालेले पोलीस कर्मचारी नवीन ठिकाणी रुजू होत नाहीत, तोपर्यंत नवीन बदलीचे आदेश जारी करू नयेत, अशी सूचना पोलीस मुख्यालयाला केली. यावर शेवटचा उपाय म्हणून पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठा निर्णय घेऊन ४ फेब्रुवारी रोजी बिनतारी संदेश जारी केला. त्यानुसार, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन नवीन ठिकाणाहून निघणार असल्याचे निर्देश जारी केले आहेत. याशिवाय बदली झालेले आणि सुटीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या ठिकाणाहून मुक्त केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता संबंधित सुमारे २३० कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी रुजू होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
तीन आदेशांद्वारे मागील वर्षी ‘यांची’ बदली झाली
२१ फेब्रुवारी २०२४ : एकूण २६४ जण. ४ उपनिरीक्षक, ६१ साहाय्यक उपनिरीक्षक, ४० हवालदार, १५१ काँन्स्टेबल, २ हवालदार (आरटीओ) आणि ६ काॅन्स्टेबल.
११ जुलै २०२४ : एकूण ४१६. ७१ साहाय्यक उपनिरीक्षक, २२१ हवालदार, १२१ काॅन्स्टेबल, २ हवालदार (आरटीओ) आणि एक काॅन्स्टेबल (बिनतारी संदेश).
२७ सप्टेंबर २०२४ : एकूण ७०४. ३६ उपनिरीक्षक, २३ साहाय्यक उपनिरीक्षक, ६८ हवालदार, ५६७ काॅन्स्टेबल, ३ साहाय्यक उपनिरीक्षक (बिनतारी संदेश), ४ हवालदार (आरटीओ), एक काॅन्स्टेबल (बिनतारी संदेश) आणि दोन काॅन्स्टेबल (आर्मरर).