२०१९ ते २०२३ काळातील आकडेवारी : देशात ३.९२ लाख महिलांना बाधा
गोवन वार्ता
पणजी : राज्यात २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत महिन्याला सरासरी ९ महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता. यादरम्यान संपूर्ण देशात महिन्याला सरासरी ६,५३५ महिलांना हा कर्करोग झाला होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तराद्वारे ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरातून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्प राबवत आहे. यानुसार २०१९ ते २०२३ या काळातील देशभरातील कर्करोग बाधितांची तसेच यामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी काढण्यात आली आहे. या पाच वर्षांत गोव्यात ५३० महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे समोर आले. वरील कालावधीत सर्वाधिक ११० रुग्ण २०२३ मध्ये आढळले होते. २०१९ मध्ये सर्वांत कमी म्हणजे १०२ रुग्ण आढळले होते. २०२० मध्ये १०३, २०२१ मध्ये १०६, तर २०२२ मध्ये १०९ महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता.
२०१९ ते २०२३ दरम्यान देशात ३.९२ लाख महिलांना गर्भशयाच्या मुखाच्या कर्करोगाची बाधा झाली. यादरम्यान उत्तर प्रदेश येथे सर्वाधिक ५४,५१४ महिला रुग्ण आढळल्या होत्या. यानंतर महाराष्ट्रात ३४,६४४, बिहारमध्ये २७,४८३, कर्नाटकमध्ये २५,६३०, मध्य प्रदेशमध्ये २१,९८७, गुजरातमध्ये २०,३१७ बाधित महिला आढळल्या होत्या. वरील काळात अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वांत कमी १३५ महिलांना गर्भशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता.
वाढत्या वयानुसार कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. गेल्या काही वर्षांत संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण आल्याने आयुष्यमान वाढले आहे. यामुळे अधिक लोकांना कर्करोगाची बाधा होण्याची शक्यता वाढली आहे. लोक कर्करोग आणि एकूणच स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वैद्यकीय सल्ला घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या क्षेत्रात कर्करोगाच्या गाठी तपासण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. या कारणांमुळे कर्करोग रुग्णांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे.
देशभरात ९ लाख महिलांची चाचणी
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेत दिलेल्या अन्य एका प्रश्नाच्या उत्तरानुसार, देशात असंसर्गजन्य रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या ‘एनसीडी’ पोर्टलनुसार, ३१ जानेवारी २०२५ पर्यंत देशभरात सुमारे ९ लाख महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी चाचणी करण्यात आली होती. यामध्ये ९६,७४७ महिलांना कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले होते. यातील ८६,१९६ रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.