राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार सुरुवात
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू होणार आहे. गुरुवारी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिलई यांच्या अभिभाषणाने अधिवेशनास सुरुवात होईल. शुक्रवारी कामकाजाचा दिवस असणार आहे.
दोन दिवसीय अधिवेशनात आमदारांनी ५० तारांकित आणि १९१ अतारांकित असे एकूण २४१ प्रश्न विचारले आहेत. गेल्या काही महिन्यांत राज्यात सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रकरणांसह कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातही प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रश्नांवरून विरोधी आमदार सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत सत्ताधारी गटातील भाजप, मगो आणि अपक्ष आमदार एकसंध आहेत. अधिवेशनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांची बैठकही घेतली. विरोधी आमदारांत मात्र एकी नसल्याचे गेल्या काही दिवसांत स्पष्ट झाले आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर यांनी सुरुवातीलाच आपण विरोधकांसोबत नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इतर सहा विरोधी आमदार संघटितपणे सरकारला घेरणार की आपापल्या पक्षाच्या अजेंड्यानुसार जाणार, हे शुक्रवारीच दिसून येणार आहे.