पुढील पाच दिवस कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अंदाजात ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात उष्णता वाढण्याची आणि थंडी कमी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
बुधवारी पणजीत कमाल ३३.५ अंश, तर किमान २०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३३.३ अंश, तर किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस राहिले. हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्राच्या नोंदीनुसार, साळगावमध्ये कमाल ३३.४ अंश, म्हापसामध्ये ३२.७ अंश, पेडण्यात ३४.५ अंश, तर मोपा येथे ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. म्हापसा येथील किमान तापमान १९ अंश, तर साळगावमधील १९.४ अंश सेल्सिअस होते.
राज्यात पुढील पाच दिवस किमान तापमान २१ ते २२ अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता असून या दरम्यान काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.