दिल्लीत मतदान शांततेत; एक्झिट पोलनुसार दिल्ली भाजपची

६०.१५ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क


3 hours ago
दिल्लीत मतदान शांततेत; एक्झिट पोलनुसार दिल्ली भाजपची

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवारी मतदान झाले. ६०.१५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले. बहुतांश एक्झिट पोलमधून भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एका पोलमधून आम आदमी पक्ष (आप) पुन्हा सरकार स्थापन करेल, असे म्हटले आहे.
‘मॅट्रिझ’च्या मते भाजपला आघाडी मिळू शकते. ‘आप’ला ३२-३७, तर भाजपला ३५-४० जागा मिळू शकतात. काँग्रेसला ०-१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘चाणक्य स्ट्रॅटेजीज’च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. भाजपला ३९-४४, आपला २५-२८, तर काँग्रेसला २-३ जागा मिळू शकतात. ‘पोल डायरी’ने भाजपला ४२ ते ५० जागा मिळतील, असे म्हटले आहे. आपला १८ ते २५ जागा आणि काँग्रेसला ०-२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘पीपल्स पल्स’च्या अंदाजानुसार, भाजपला ५१-६० आणि आपला १०-१९ जागा मिळतील. काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. ‘जेव्हीसी’नुसार, भाजपला ३९-४५ जागा, आपला २२-३१ जागा आणि काँग्रेसला ०-२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘पोल ऑफ पोल्स’मध्ये भाजपला ४१, आपला २८ आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी
भाजप आणि आप यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने लढलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. काँग्रेससाठीही ही अस्तित्वाची लढाई आहे. मतदारराजा कुणाच्या हाती दिल्लीच्या तिजोरीची चावी सोपवतो हे शनिवार, ८ फेब्रुवारीलाच समजणार आहे.