तक्रारीनंतर १० कोटी वाचवण्यात यश : फसवणुकीपासून वाचण्यासाठी ‘१९३०’ हेल्पलाईन
मडगाव : राज्यात सायबर क्राईमचे प्रमाण खूप जास्त वाढले असल्याने गोवा पोलीस प्रशासनाने जनजागृतीवर भर दिला आहे. गेल्यावर्षी सायबर क्राईमद्वारे गोव्यातील लोकांची १०१ कोटींची आर्थिक फसवणूक झालेली असून १९३० क्रमांकावर तक्रार केलेल्यांचे १० कोटी रुपये वाचवण्यात यश आले. त्यामुळे आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी १९३० हा क्रमांक हेल्पलाईन आहे, असे मडगावातील जागृतीपर कार्यक्रमावेळी अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
मडगाव पोलीस मुख्यालयात प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींसाठी आयोजित कार्यक्रमावेळी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर बिरादार यांनी सायबर क्राईमसाठी वापरल्या जाणार्या विविध पद्धतींची माहिती दिली. आर्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० क्रमांकावर कॉल करुन आवश्यक ती माहिती देऊन तक्रार नोंद करावी. अन्यथा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा एनसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंद करावी, असे त्यांनी सांगितले. फसवणुकीसाठी विविध फंडे वापरले जात असून केवळ सतर्क राहणे हाच यावर उपाय असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी सांगितले की, आर्थिक फसवणुकींचे प्रमाण वाढत असताना डिजिटल उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करुन फसवणूक होत आहे. सध्या ९९ टक्के गुन्हे हे सायबर क्राईमचे असल्याचे दिसून येते. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही तासांतच रक्कम वेगवेगळ्या खात्यात वळवण्यात येत असल्याने त्याआधीच १९३० या क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास तत्काळ दखल घेत बँक खाती गोठवण्यात येतात व आर्थिक नुकसानी होणार नाही. त्यामुळे सायबर क्राईम प्रकरणात आर्थिक नुकसान वाचण्यासाठी १९३० हा क्रमांकच लाईफलाईन ठरू शकते, असेही सांगितले.
गोवा पोलिसांकडून जनजागृती
या कार्यक्रमावेळीच राज्यात गेल्यावर्षभरातील सायबर गुन्ह्यांमधून गोमंतकीय जनतेची १०१ कोटी २६ लाख एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झालेली आहे. तर ज्या व्यक्तींनी फसवणुकीनंतर तत्काळ १९३० क्रमांकावर तक्रार नोंद केली, त्यांचे सुमारे १० कोटी ७५ हजार ६७१ रुपये वाचवण्यात यश आल्याचेही सांगण्यात आले. अजूनही हे प्रकार थांबलेले नसल्याने गोवा पोलिसांकडून जनजागृती केली जात असल्याचेही सांगण्यात आले.
लोकांनी सतर्क रहावे : पोलीस अधीक्षक वर्मा
राज्यात सायबर क्राईमद्वारे आर्थिक फसवणुकीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. दक्षिण गोवा पोलिसांकडूनही यावर उपाययोजना म्हणून लोकांना फसवणुकीच्या प्रकारांबाबत माहिती देत जागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारी दक्षिण गोव्यातील सुमारे ४४ ठिकाणी सायबर क्राईमबाबत माहितीपर शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात रिक्षाचालक, बसचालक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, औद्योगिक वसाहतीतील कामगार, मार्केट परिसर, किनारी भाग, विमानतळ परिसर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था, पंचायत घर अशा विविध भागात पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सांगण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.