महसूलमंत्र्यांच्या शेऱ्यानुसार खात्याच्या अव्वल सचिवांकडून आदेश जारी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, तसेच जमीन सर्वेक्षण संचालक या अधिकाऱ्यांकडून विभागप्रमुख या नात्याने कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी होत होते. दरम्यान, सरकारची पूर्वपरवानगी किंवा मंजुरी घेतल्याशिवाय तलाठी, मंडळ निरीक्षक आणि अव्वल कारकून, तसेच फिल्ड सर्वेक्षक यांच्या बदल्या करू नयेत, असा आदेश महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या शेऱ्यानुसार महसूल खात्याचे अव्वल सचिव संदीप गावडे यांनी आदेश जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पेडणे तालुक्यातील एका तलाठीची बदली बार्देश तालुक्यात केली होती. तसेच दोन-तीन तलाठ्यांची बदलीही करण्यात आली होती. याशिवाय चार अव्वल कारकून (एके) आणि दोन अप्पर डिव्हिजन लिपिक (युडीसी) यांची बदली करण्यात आली होती. याशिवाय जमीन सर्वेक्षण संचालनालयातील फिल्ड सर्वेक्षकांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते. यातील बार्देश तालुक्यात बदली झालेला तलाठी तीन दिवसांत पुन्हा पेडणे तालुक्यात रुजू झाला. तर चारपैकी एक अतीमहनीय अव्वल कारकूनच्या बदलीमुळे महसूल खात्यात धावपळ उडाली होती. याच दरम्यान महसूल प्रशासन तलाठी, मंडळ निरीक्षक आणि अव्वल कारकून, तर जमीन व्यवस्थापन विभागप्रमुख फिल्ड सर्वेक्षकाची बदली करत असल्याचे महसूलमंत्र्यांच्या नजरेस आणून देण्यात आले. त्यानंतर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महसूल खात्याला ३० जानेवारी २०२५ रोजी शेरा जारी केला.
बदल्यांचे काटेकोरपणे नियमन करणे अत्यावश्यक
महसूल प्रशासन आणि जमीन व्यवस्थापनात सेवा बजावत असलेल्या वरील अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे, सार्वजनिक सेवा वितरणात कार्यक्षमता, सातत्य आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अशा बदल्यांचे काटेकोरपणे नियमन करणे अत्यावश्यक असल्याचे मंत्री बाबूश मॉन्सेरात यांनी नमूद केले होते. या संदर्भात महसूल खात्याला आवश्यक सूचना जारी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, महसूल खात्याचे अव्वल सचिव संदीप गावडे यांनी आदेश जारी केला. त्यामुळे हा विषय प्रशासकीय अधिकाऱ्यांत चर्चेचा बनला आहे.