पर्येचा ब्राह्मी शिलालेख

आजच्या मराठी भाषेचा इतिहास हा किमान दोन हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जात असून, मराठीशी साधर्म्य दर्शविणारे अभिलेख इसवी सनाच्या सातव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात.

Story: विचारचक्र |
04th February, 10:18 pm
पर्येचा ब्राह्मी शिलालेख

एखाद्या प्रदेशाचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने तेथील मूर्ती शिलालेख, ताम्रपट, ऐतिहासिक वास्तू, लोकपरंपरा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शिलालेखांद्वारे लिखित मजकूर अनंत काळापर्यंत टिकून रहावा म्हणून दगडावर कोरून ठेवण्याची परंपरा जगभर अस्तित्वात असून राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने असे शिलालेख उपयुक्त ठरलेले आहेत. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील शिलालेख गुप्त सम्राट समुद्रगुप्त या इसवी सनाच्या चौथ्या शतकातील कारकिर्दीविषयीचे महत्त्वाचे पुराभिलेखीय साधन ठरलेला आहे. गुप्त राज‌घराण्यातील हा पहिलाच उपलब्ध कोरीव लेख असून, तो ब्राह्मी लिपीत आणि संस्कृत भाषेत कोरलेला आहे. दिग्विजयी ठरलेला समुद्र‌गुप्त सम्राट चंद्रगुप्त पहिला आणि त्याची राणी कुमारदेवी यांचा पुत्र असल्याचे सदर शिलालेख स्पष्ट करत आहे. तो योद्धा, राजकारण धुरंधर, गायन आणि वादनकलेत निपुण आणि कवितांची निर्मिती करत असल्याचे समजते. सम्राट अशोकाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असलेला पहिला शिलालेख कर्नाटक राज्यात‌ील मस्की या रायचूर जिल्ह्यातील गावात आढळलेला आहे. अशाच आशयाचा दुसरा शिलालेख मध्य प्रदेशाती‌ल दतिया जिल्ह्यात गुजर्रा येथे आढळलेला आहे. सम्राट अशोकाचे शिलालेख, अशोकस्तंभ, मोठमोठ्या गोलाकार खडकांवर आणि गुहांमधील भिंतींवर कोरलेले आढळलेले आहेत. 

आजच्या मराठी भाषेचा इतिहास हा किमान दोन हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जात असून, मराठीशी साधर्म्य दर्शविणारे अभिलेख इसवी सनाच्या सातव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. त्यात अलिबाग जवळच्या आक्षीचा शिलालेख मराठी भाषेतील ज्ञात असलेला सर्वात प्राचीन शिलालेख असल्याचे मानले जाते. सात‌वाहनकालीन नाणेघाटातील शिलालेखात वापरण्यात आलेली भाषा 'महाराष्ट्री प्राकृत' असून लेखाची लिपी ब्राह्मी आहे आणि त्यामुळे नाणेघाट‌‌ातला हा शिलालेख मराठीचा अभिजात वारसा स्पष्ट करतो. पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टी यांच्या कुशीत वस‌लेला गोवा शेकडो वर्षांपासून देश विदेशातील व्यापारी, यात्रेकरू यांना आकर्षण बिंदू ठरलेला होता. युरोपियन सत्ताधिशांची सत्ता सर्वप्रथम भारतीय उपखंडात गोव्यात स्थापन झाली, ती सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात, त्यावरून राजकीयदृष्ट्या असलेले गोव्याचे महत्त्व स्पष्ट होत आहे.

कर्नाटक राज्यातील‌ सगळ्यात प्राचीन शिलालेख हा हसन जिल्ह्यातील बेलूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या सलमाडी गावात आढळलेला आहे. हा शिलालेख कन्नड लिपीतील असून, कदंब राजघराण्यातील नृपती काकुथ्सबर्मन याच्या राजवटीतील इसवी सन ४५० चा आहे. कदंब राजा ककुथ्सबर्मनच्या या शिलालेखातून प्रशासकीय भाषेच्या दृष्टीने कन्नडच्या होणाऱ्या वापरावर प्रकाशझोत पडलेला आहे.

पोर्तुगीज अमदानीत गोव्यातल्या जुन्या काबिजादीत येणाऱ्या तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या महालांतील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचिताचा मोठ्या प्रमाणात विद्ध्वस्त करण्यात आला. परंतु सांगे, सत्तरी, केपे, काणकोण, पेडणे, धारबांदोडा महालावर शिवशाही आणि सौंदेकरांची सत्ता असल्याने आणि जेव्हा हे प्रदेश पोर्तुगिजांच्या सत्तेखाली आले, त्यावेळी धार्मिक समीक्षा बंद झाल्याकारणाने येथील काही शिलालेखांचे वाचन पुराभिलेख संशोध‌कांना करण्यात यश लाभलेले आहे. सांगे येथील महामायेच्या मंदिरात आढळलेल्या सिंह राजाचा अभिलेख पाचव्या शतकातील अस‌ल्याचे मत त्याच्या संशोधनावरून इतिहासकारांनी मांडलेले आहे. उगे येथील महामायेच्या मंदिरातला अभिलेख राज्यातील सर्वात जुना असल्याचे मानले जात होते. परंतु १९९३ साली पर्ये - सत्तरीतील सातेरी मंदिराच्या भग्नावशेषांसमोरील उभ्या स्थितीत असलेल्या दगडावर ती अक्षरे असल्याची बाब तत्कालीन गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी त्यावेळचे पुराभिलेख खात्याचे संचालक डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. एका उभ्या दगडावर ती जी अक्षरे कोरली होती, ती तिसऱ्या अथवा चौथ्या इसवी सनाच्या शत‌कातील असल्याचे मत त्यावेळी त्यांनी धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातील संशोधक डॉ. श्रीनिवास रिट्टीचा दुजोरा देऊन मांडले होते. संस्कृत भाषा आणि या ब्राह्मी लिपीतील या शिलालेखाचा नव्याने अभ्यास आणि संशोधन करण्याची गरज निर्माण झाली होती. 

उडपी - कर्नाटक येथील प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक मुरुगेशी टी. यांनी पर्ये येथील महिषासुरमर्दिनीला सातेरीच्या रुपात पुजणाऱ्या भग्न ‌मंदिराला भेट देऊन, तेथे उभ्या स्थितीत दगडावर कोरलेल्या अभिलेखाचे नव्याने संशोधन करण्याचा निर्णय घेतला. पोर्तुगीजपूर्व काळापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील प्रदेशाला जोडणारा जुना चोर्लाघाट मार्ग साखळी - पर्येहून पुढे जात असल्याने पूर्वीच्या काळी हे मंदिर विशेष नावारुपाला आले होते. या मंदिराचा शेकडो वर्षांचा इतिहास आणि संस्कृतीचा वारसा खरेतर १९९३ साली प्रकाशात आला होता, परंतु या दगडावर कोरलेल्या शिलालेखातून काय अभिप्रेत होते, हे सांगण्याचा विशेष प्रयत्न प्रा. मुरुगेशी टी. यांनी त्याचे पुनर्वाचन नव्याने करून केलेला आहे. प्राचीन ते मध्ययुगीन कालखंडात गोव्यावर भोज, बदामी चालुक्य, कोकण शिलाहार, गोवा कदंब, राष्ट्र‌कुट या राजघराण्यांशिवाय अभिर त्र्यैकुटक, बटपुरा, कलचुरी, विजयनगर आदींची सत्ता वेगवेगळ्या काळात प्रस्थापित झाली होती, याचे पुरावे आढळलेले आहेत. परंतु मुरुगेशी टी. यांच्या नव्या संशोधनानुसार पर्ये येथील शिलालेखावर दोन ओळींचा मजकूर असून त्यानुसार चौथ्या अथवा पाचव्या शतकात गोव्याच्या या प्रदेशावर आजपर्यंतच्या इतिहासाला ज्ञात नसलेल्या हैहया राजघराण्याची ज्यावेळी सत्ता होती, तेव्हा हैहया घराण्याचा राजा धर्मा यज्ञो याने आपल्या सैन्यासह येथे यज्ञ केला होता आणि त्यावेळी या दगडाच्या रूपात येथे युपस्तंभ उभारला असावा, असे मत मांडलेले आहे. हैहया राजघराण्याचा पुराणात संदर्भ आढळत असून, प्राचीन काळातील वतीहोत्र शर्याता, भोज, अवंती आणि तुंडीकेरा वंशांचा समावेश हैहयात होत असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. उत्तर आणि दक्षिणेकडील वेगवेगळ्या भागांवर हैहयांनी राज्य केले आहे. चालुक्य, राष्ट्रकुट आणि कलिंगाच्या गंगा आणि वेंगीमधल्या बऱ्याच राजवंशाशी काही हैहया राजपुत्र संबंधित असल्याचे संदर्भ आढळतात. हैहयाचा उल्लेख पर्येच्या शिलालेखात आढळल्याने, या प्रदेशाच्या इतिहासावर नवा प्रकाश पडलेला आहे.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५