सत्याच्या दिशेने ठराविक पाऊल उचलणे

भक्ती म्हणजे स्वतःला रिकामे करण्याचे एक साधन. जर तुम्ही स्वतःला रिकामे केले, तर तुम्ही झोपेत सुद्धा स्वाभाविकपणे जागरूक राहाल. जर तुमच्यात भक्तीची ज्योत पेटली आणि मी तुम्हाला एखादे छोटे तंत्र शिकवले, तर ते एक उत्कृष्ट प्रक्रिया म्हणून काम करेल.

Story: विचारचक्र |
02nd February, 09:36 pm
सत्याच्या दिशेने ठराविक पाऊल उचलणे

सद्गुरू : सत्संग हा सत्याशी नाते विकसित करण्याचा एक मार्ग आहे. सत्याचे आपल्याशी नाते आहे, नाहीतर आपण अस्तित्वात असू शकलो नसतो. पण सध्या तुमचे सत्याशी नाते नाही - हे दुसऱ्या बाजूने असलेले, एकतर्फी प्रेम प्रकरण आहे. जर तुमचा सत्याशी प्रेमसंबंध नसेल, तर जीवनातील कोणत्याही परिस्थितीतून जाताना आयुष्य रोजच तुमच्यावर जबरदस्ती करत आहे असे वाटेल. जर तुमचा एखाद्या गोष्टीत संपूर्ण सहभाग नसेल, तर तुम्हाला अडकल्यासारखे आणि दु:खी वाटेल. एखाद्या सकाळी कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जागे तरी का व्हायचे? पण जर तुम्ही कोणत्यातरी मार्गाने, तुम्ही  निर्माण न केलेल्या गोष्टीला स्पर्श केला, जर तुम्ही सत्याला स्पर्श केला, तर अचानक तुम्हाला उठून त्या गोष्टीवर काम करावेसे वाटते.

सत्याशी नाते जोडणे म्हणजे जे खोटे आहे ते मारून टाकले पाहिजे. फक्त एक मिनिट घ्या आणि तुमच्या आयुष्यातील किमान एक अशी गोष्ट शोधा जी गरजेची नाही आणि ती आजच मारून टाका. जेव्हा मी "मारून टाका" असे म्हणतो, तेव्हा तुमच्या बॉसबद्दल, सासूबद्दल किंवा शेजाऱ्यांबद्दल विचार करू नका. तुम्ही असे काहीतरी संपवले पाहिजे, जे तुमच्या जीवनासाठी अनावश्यक आहे. "मी माझा राग संपवेन" हे खूप सर्वसाधारण असेल. तुम्ही जर एखाद्या गोष्टीला मारत आहात, तर ती पूर्णपणे मारायला हवी आणि ती उद्या परत येता कामा नये.

एखादी अशी गोष्ट शोधा ज्याशिवाय तुम्ही व्यवस्थित राहू शकता, ज्यासाठी तुम्ही आजच एक ठोस पाऊल उचलू शकता - मग ती कितीही छोटी असू दे. "मी भूतकाळात जगणार नाही. मी भविष्यात जगणार नाही. मी वर्तमानात जगेन," अशा सर्वसाधारण गोष्टी ठरवू नका, कारण या गोष्टी निश्चयाने साध्य होणार नाहीत - यासाठी जागरूकता लागते. एक विशिष्ट छोटी गोष्ट निवडा जी तुम्ही यापुढे कधीही करणार नाही, अगदी काहीही झाले तरी. उदाहरणार्थ, "मी रागाने बोलणार नाही." "मी रागावणार नाही" हे खोटे ठरेल, कारण ते अजूनही तुमच्या नियंत्रणात नाही.

 तुम्ही जे करू शकता आणि कराल असे काहीतरी ठरवा. अशाप्रकारे तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता - टप्प्याटप्प्याने. पण तुम्ही ते प्रत्यक्षात केले पाहिजे - ते पुन्हा पुन्हा उद्भवायला नको. जर तुम्हाला सत्याशी नाते जोडायचे असेल, तर जे सत्य नाही त्यात तुमची गुंतवणूक कमी करावी लागेल. ते कदाचित लगेच नाहीसे होणार नाही, पण तुम्ही ते टप्प्याटप्प्याने कमी केले पाहिजे.

जीवनात बदलता येण्याऱ्या गोष्टींकडे पहा आणि त्याबाबत काहीतरी करा. बदलता न येणाऱ्या गोष्टींसाठी रडत बसणे म्हणजे आहे तसेच राहणे. खोटेपणात गुंतवणूक कमी केल्यास, सत्य आपोआप प्रगट होईल. दर महिन्यात किमान एकदा, पौर्णिमेच्या दिवशी, जाणीवपूर्वक याकडे पहा आणि स्वतःच्या बाबतीत एक छोटी गोष्ट शोधा जी तुम्हाला बदलायची आहे. जसे की, "मी प्रत्येकवेळी जेवणाआधी १० सेकंदासाठी माझा भाग होणाऱ्या अन्नाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीन." किंवा, "माझ्या जीवनातील महत्त्वाच्या घटकांचा वापर करताना, जसे की - माती, पाणी, हवा आणि माझ्या भोवतालच्या बाकीच्या गोष्टी यामधले मी १ टक्के वाचवेन." किंवा, "माझ्या ताटात मी खाऊ शकेन फक्त तेवढेच वाढून घेईन." या छोट्या गोष्टी तुमचे जीवन बदलतील आणि तुम्हाला वेगळे बनवतील.

जे खरे नाही, जे तुमच्यासाठी चांगले नाही, ते तुमच्या जीवनातून खरोखर काढून टाका. जर तुम्ही हे मनावर  घेतले, तर तुम्ही जीवनाची मूलभूत वीण तयार कराल. अन्यथा, तुम्ही ज्या काही पद्धती वापराल त्या फाटलेल्या कापडावरच्या भरतकाम ठरतील. त्याचा खरोखर काही लाभ होणार नाही. तुमच्या आयुष्याची मूलभूत वीण घट्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, एकतर तुम्ही जागरूकता निवडली पाहिजे, जे खूप कठीण काम आहे किंवा तुम्ही भक्तिभाव निवडला पाहिजे, जो सोपा आहे पण वेगळ्या प्रकारे कठीण आहे. भक्ती ही हृदयहीन गोष्ट आहे. तुमचे हृदय आता तुमचे नाही. तुम्ही ते विश्वभर उधळले आहे, पण भक्तीची तळमळ तुमच्यात सतत पेटत राहते. तुम्ही भक्तीची ज्योत तेवत ठेवली, तर जागरूकता वाढेल.

मुळात, भक्ती म्हणजे स्वतःला रिकामे करण्याचे एक साधन आहे. जर तुम्ही स्वतःला रिकामे केले, तर तुम्ही झोपेत सुद्धा स्वाभाविकपणे जागरूक राहाल. जर तुमच्यात भक्तीची ज्योत पेटली आहे आणि मी तुम्हाला एखादे छोटे तंत्र शिकवले, तर ते एक उत्कृष्ट प्रक्रिया म्हणून काम करेल. जर हा पाया नसेल, तर कोणतेही तंत्र किंवा पद्धत खरोखर तुमचे परिवर्तन करू शकणार नाही. मग ते इनर इंजिनियरिंग, भाव स्पंदना किंवा सम्यमा असो, केवळ पद्धत किंवा तंत्र समजून घेणे पुरेसे नाही. जर तुम्ही जीवनाची मूलभूत वीण योग्य प्रकारे रचली, तरच ते अद्भुतरित्या काम करेल.

पुष्कळ लोकांना "भक्ती" या शब्दाबद्दल वावडे आहे कारण त्यांना वाटते की, भक्ती म्हणजे मंदिरात, चर्चमध्ये किंवा इतर धार्मिक ठिकाणी जाणे. मला वाटते की भक्तीचा अर्थ असा नाही. एखाद्याने स्वतःच्या जीवनात करत असलेल्या गोष्टींबद्दल समर्पण न दाखवता काही महत्त्वपूर्ण केले आहे का? समर्पणाशिवाय, तुम्ही जे काही कराल ते सामान्यच राहील. करत असलेल्या गोष्टीबद्दलच्या संपूर्ण समर्पणातूनच खरोखर महान गोष्टी एखाद्याकडून घडतात.

हे फक्त आध्यात्मिक प्रक्रियेसाठीच नाही. मग ते विज्ञान, क्रीडा, कला, संगीत किंवा इतर काहीही असो - जोपर्यंत लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य वाहून घेत नाहीत, तोपर्यंत काहीही महत्त्वपूर्ण घडलेले नाही. तुम्हाला जे योग्य वाटते, तुमच्या जीवनात जे सर्वोच्च वाटते, त्यासाठी स्वतःला वाहून घ्या. तुम्ही स्वतःसाठी ही आवश्यक वीण तयार केली, तर मी एक टाका घालू शकतो आणि त्यातून एक सुंदर नक्षी बनेल.


- सद्गुरू 

(ईशा फाऊंडेशन)