सरकारी यंत्रणांनी बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करावी

Story: अंतरंग |
02nd February, 09:35 pm
सरकारी यंत्रणांनी बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करावी

राज्यात गेल्या दोन महिन्यात किनारी भागातील शॅक मालक आणि त्यांच्या कामगारांच्या दादागिरीमुळे दोन खून झाले. याशिवाय किनारी भागात बलात्कार, गोळीबार, अमली पदार्थ तस्करी व इतर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. याशिवाय कळंगुटमध्ये बोट दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर पॅराग्लायडिंग अपघातात दोघांचा मृत्यू झाला. राज्यात पर्यटन व्यवसायावर सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्यामुळे अशी बेकायदेशीर कृत्ये तसेच अंदाधुंद कारभार सुरू आहे. 

आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र असल्यामुळे राज्यात देशी तसेच विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व असलेल्या पर्यटन व्यवसायासोबत अनैतिक गोष्टींचाही राज्यात प्रवेश झालेला आहे. वरील घटनांचा पर्यटन व्यवसायावर वाईट परिणाम होत आहे. अशा घटनांवर वेळीच उपाययोजना करून कायदा व सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गोव्याची होणारी बदनामी थांबेल.

पर्यटकांना यापूर्वीही मारहाण झालेली आहे. डिसेंबर अखेरीस कळंगुट किनाऱ्यावरील एका शॅकमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून आठ जणांचा पर्यटकांचा गट आणि शॅक मालक यांच्यात सुरू झालेल्या वादात एका पर्यटकाचा खून झाला. तसेच २६ जानेवारी रोजी संध्याकाळी हरमल किनाऱ्यावर क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका स्थानिक युवकाचा बळी गेला. त्या युवकाला शॅक मालकासह त्याच्या कर्मचाऱ्यांनी मरेस्तोवर मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी काहीजणांना अटक केली. वरील दोन्ही घटना पाहिल्या असता, किनारी भागात पोलीस, जिल्हाधिकारी, पर्यटन खाते तसेच इतर सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे. एका बाजूने गोव्याच्या पर्यटनाची बदनामी होत असताना दुसऱ्या बाजूने शॅक मालक, शॅकमधील कामगारच पर्यटकांना मारहाण करून गोव्याच्या बदनामीत भर घालत आहेत. या दोन्ही घटनांनंतर सरकारी यंत्रणेने कारवाई सुरू केली. वरील घटनेनंतर संबंधित शॅक स्थानिकाने सबलीज केल्याचे समोर आले. त्यामुळे पर्यटन खात्याने शॅक मालकाला २५ लाख रुपये दंड ठोठावला, तर बेकायदेशीर पॅराग्लायडिंग पर्यटन खात्याने तात्पुरते स्थगित ठेवले आहे.

राज्यात आणि खास करून किनारी भागातील मागील एका महिन्यातील घटनांची दखल घेऊन पोलीस, पर्यटन खाते, तसेच इतर सरकारी यंत्रणांनी सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्थानिकांनी महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे. नाहीतर त्याचा वाईट परिणाम पर्यटन व्यवसायावर होणार आहे. 

- प्रसाद शेट काणकोणकर, गोवन वार्ता