नॉट फ्रेंड्स नॉट स्ट्रेंजर्स

खरेतर मैत्री हे फार महत्त्वाचे आणि जबाबदारीने निभावण्याचे नाते आहे. ती अशी पटकन आणि सहज कुणाशी होऊ नयेच… आणि एकदा झाली की एवढ्या तेवढ्यावरून संपूही नये.

Story: आवडलेलं |
01st February, 06:25 am
नॉट फ्रेंड्स नॉट स्ट्रेंजर्स

मी जेव्हा माझे शहर सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक झाल्यावर असे नवीन मैत्र शोधायला लागले, तेव्हा माझ्याभोवती सुरुवातीला कामाच्या ठिकाणच्या ओळखी, शेजारी-पाजारी, नवऱ्याच्या मित्रांच्या बायका आणि नंतर मुलाच्या मित्रांचे आई-वडील हे होते. पण यातल्या एकदोघांशी वगळले, तर इतर कुणाशीच अगदी सहज जुळावेत असे सूर जुळलेच नाहीत. परिणाम म्हणजे माझा समज अजूनच पक्का होत गेला आणि मैत्र शोधायची माझी धडपड मी थांबवली. 

मग मात्र एखादा चमत्कार घडावा, तसे घडत गेले. माझ्या ओळखीच्या काही जणांशी ओळख वाढत गेली. मी मैत्री शोधायच्या प्रयत्नात नसल्यामुळे कृत्रिमपणे काही न घडता, नैसर्गिकपणे सगळे झाले. हळूहळू ओळख वाढत जाऊन, एकमेकांचे विचार समजून घेऊन, भावनांची देवाण-घेवाण होऊन, घरच्यांशी ओळख होऊन होणारा मैत्रीपर्यंतचा प्रवास अगदी नैसर्गिकपणे झाला. पण या मैत्रिणी माझ्यापेक्षा दुप्पट आणि काही त्याहून जास्त वयाच्या आहेत. म्हणजे माझेच काहीतरी चुकत होते का? मी मैत्री शोधताना निकष ठेवले होते का? वय, लिंग, कामाचे स्वरूप हे सगळे जुळले तरच मैत्री होते का?आत्तापर्यंत केवळ आपल्या वयाच्या लोकांशीच आपली मैत्री होऊ शकते हा समज आपसूक पुसला गेला. शाळा-कॉलेजच्या वयात असलेले निकष चूक नसले तरीही वाढत्या वयात मात्र ते लागू होतीलच असे नाही. 

खरेतर माझ्या आयुष्यात या अचानक आलेल्या मैत्रिणींचा मी अनेकदा विचार करते. याबद्दल मला आश्चर्याने काही लोक विचारतातदेखील. मग त्याबद्दल मी अधिकच विचार करते आणि लक्षात येते की, मन जुळली तर मैत्री होतेच... मग क्वचित विचार जुळले नाहीत, मते वेगळी असली तरीही चालतात. 

याच विचारांचा धागा पुढे वाढत गेला, तो ‘नॉट फ्रेंड्स नॉट स्ट्रेंजर्स’ या लघुपटामुळे. एखाद्या वेळी असे होते की, लघुपटाचा विषय, त्यात असलेल्या घटना या अगदी वेगळ्या असतात. त्या घटनांचा तसा आपल्या आयुष्याशी थेट संबंध नसतोच. पण तरीही त्या गोष्टीचा आशय मात्र आपल्या गोष्टीशी जुळणारा असतो... किंवा असे म्हणता येईल की, त्याचा एकूण आशय आपल्याला आपल्या आयुष्यातील काही घटनांचा विचार करण्यास भाग पाडतो. या लघुपटाची सुरुवात होते, ती लॉकडाऊनच्या काळातल्या पार्श्वभूमीवर. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात उलथापालथ करणारा तो काळ होता. त्याच काळाच्या जबड्यात सापडलेली एक व्यक्ती. नोकरी, काम नसल्यामुळे आधीच चिंतेत असलेली ही मुलगी करोना व्हायरसलासुद्धा फार घाबरत असते. हीच भीती हळूहळू त्या अजरापुरती मर्यादित न राहता तिच्या इतर आयुष्यालाही स्पर्श करत असतात. यामुळे तिच्या आयुष्यातल्या साध्या घटनासुद्धा अवघड होत असतात. अशातच तिच्या संपर्कात एक मुलगी येते. तिच्याकडे बघतानाही हिच्या मनात शंकाच असते. तिच्यापेक्षा फार वेगळी जीवनशैली, राहणी असणारी ही संपर्कात नव्याने आणि काहीशा नाईलाजाने आलेली मुलगी असते. त्यामुळे या भिंतींच्या पलीकडे जाऊन तिचे आचारविचार जाणून घ्यायची हिची इच्छा नसते. तसे कोणतेच प्रयत्न न करता, आमची मैत्री होऊच शकत नाही असे ठरवून मोकळी होते. 

मला वाटले हाच तो कठोरपणा... तो वयाबरोबर येतो. लहान वयात अगदी सहज आणि स्वाभाविकपणे होते तशी मैत्री वाढत्या वयात का होत नाही? याचे उत्तर मला माझ्यापुरते मिळाले होते. आपणच आपल्याभोवती काही भिंती उभ्या करतो आणि आपल्या स्वभावात आलेला आडमुठेपणा आपल्याला त्या ओलांडून काय, त्याच्यात असलेल्या एखाद्या झरोक्यातून बघायचीही परवानगी देत नाही. 

आपल्या आयुष्यात या गोष्टीचा सामना कसा करायचा हा ज्याच्या त्याच्या प्रश्न ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. पण साधारणत: एखादी अशी घटना घडते की, ज्यामुळे या भिंती एकतर एकदम कोसळतात किंवा हळूहळू ढासळून जातात. अशीच एक घटना घडते, ज्यामुळे लघुपटातली नायिका स्वतःभोवती निर्माण केलेल्या कोषातून बाहेर येते. आत्तापर्यंत जाणीवपूर्वक लांब ठेवलेल्या, तिच्या आयुष्यात आलेल्या या दुसऱ्या व्यक्तीला ती तिच्या कक्षेत घेते. बाह्य गोष्टी वेगळ्या असल्या तरीही कुठेतरी काहीतरी एक समान धागा असू शकतो याची जाणीव झाल्यामुळे हा बदल घडतो आणि ती मैत्री या शक्यतेचा निदान विचार करायला लावते. 

खरेतर मैत्री हे फार महत्त्वाचे आणि जबाबदारीने निभावण्याचे नाते आहे. ती अशी पटकन आणि सहज कुणाशी होऊ नयेच... आणि एकदा झाली की एवढ्या तेवढ्यावरून संपूही नये. म्हणूनच मैत्रीचा प्रवास हा मी वर सांगितल्याप्रमाणे ठराविक मैलाच्या दगडांना स्पर्श करूनच व्हायला हवा. त्यासाठी वेळ जायला हवा. मुख्य म्हणजे, ते नाते नैसर्गिकपणे निर्माण व्हायला हवे. ते निर्माण होत असतानाचा काळ फार महत्त्वाचा आणि सुंदर असतो. लघुपटात हा काळ दाखवला नाही पण त्या काळापर्यंत दोघी कशा येतात हे दाखवले आहे.  लघुपटाचे शीर्षक ‘नॉट फ्रेंड्स नॉट स्ट्रेंजर्स’ हे मला फार आवडले.. कोणत्याही भिंतींच्या आत स्वतःला कोंडून न घेता आणि त्याचबरोबर कोणत्याही नात्यात पडायची, नात्याला नाव द्यायची घाई नसलेले हे शीर्षक किती बोलके आहे, नाही?


मुग्धा मणेरीकर, फोंडा