हत्येचाही होता प्लॅन; इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्याचे कृत्य
दौंडः पुण्यातील दौंडमधल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यासाठी चक्क १०० रुपयांची सुपारी दिली होती. बलात्काराबरोबर तिची हत्याही १०० रुपयात करायची होती.
विशेष म्हणजे ही सुपारी त्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती. हे प्रकरण लपविण्यासाठी आणि शाळेची बदनामी टाळण्यासाठीचे प्रयत्न करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षिकेविरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दौंडमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ती सही त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पाहिली होती. याची माहिती तिने वर्ग शिक्षिकेला दिली.
याचा राग संबंधित विद्यार्थ्यांने मनात धरला होता. संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी १०० रुपयांची सुपारी दिली.
मात्र, ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला सांगितली. त्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपरवायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली.
मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले. यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. जर का सुपारी बाबत त्या विद्यार्थ्यानेही गंभीर पाऊल उचलले असते तर त्या अल्पवयीन मुलीला आपला जीव ही गमवावा लागला असता.