धडक झाल्यानंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीत पडले.
वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री एक प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण टक्कर झाली. अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत पडले. विमानात ४ क्रू मेंबर्ससह ६४ लोक होते. सीबीएस न्यूजनुसार, आतापर्यंत १८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
वॉशिंग्टन अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रोनाल्ड रीगन विमानतळाजवळ ही घटना घडली. यूएस एअरलाइन्सचे CRJ700 Bombardier जेट आणि लष्कराचे ब्लॅक हॉक (H-60) हेलिकॉप्टर यांच्यात हा अपघात झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. अमेरिकन एअरलाईन्सचे विमान कॅन्सस राज्यातून वॉशिंग्टनला येत होते. रात्री ९ नंतर कंपनीने अपघाताला दुजोरा दिला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री ८.५० वाजता रीगन नॅशनल एअरपोर्टला विमान अपघाताबाबत अनेक कॉल आले होते.
सध्या विमानतळावर सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. दोन्ही विमानांचे अवशेष पोटोमॅक नदीत आहेत.सध्या लोकांना वाचवण्यासाठी पाणबुड्यांना पोटोमॅक नदीत सोडण्यात आले आहे. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, विमान अपघातानंतर पाण्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांच्या जीवाला अनेक प्रकारचा धोका आहे. वॉशिंग्टनमध्ये सध्याचे तापमान शून्य अंशांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत जे लोक पाण्यात पडलेत त्यांना अवघ्या २०-३० मिनिटांत हायपोथर्मिया होऊ शकतो.
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे हे विमान रीगन नॅशनल एअरपोर्टच्या रनवे ३३ जवळ येत असताना ब्लॅकहॉक H-60 हेलिकॉप्टरला धडकले. क्रॅश झालेल्या CRJ700 Bombardier विमानाची रचना स्थानिक उड्डाणांसाठी करण्यात आली होती आणि त्यात ६८ ते ७३ प्रवासी बसू शकतात.