इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी दिलखुलास हसले
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी संध्याकाळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन केले होते. या डिनर कार्यक्रमादरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी आपल्या अनोख्या वक्तृत्व शैलीने सर्वांना खळखळून हसवले. इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डिनर समारंभाला उपस्थित असलेल्या मान्यवरांना राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील प्राचीन संबंधांबद्दलही माहिती दिली. इंडोनेशियाच्या भाषेत अनेक महत्त्वाचे शब्द हे संस्कृत भाषेतून आल्याचे ते म्हणाले. भारत आणि इंडोनेशियामधील परस्पर संबंधांचा इतिहास खूप जुना आहे. दोन्ही देशांतील संस्कृतींचा संबंध इतका आहे की आपल्या भाषेतील अनेक महत्त्वाचे शब्द संस्कृत भाषेतील आहेत. आपली अनेक नावे संस्कृत भाषेतील आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातही प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव जाणवतो असे ते म्हणाले. काही आठवड्यांपूर्वी मी माझी जेनेटिक्स सिक्वेंसिंग आणि डीएनए चाचणी घेतली. माझा डीएनए भारतीय असल्याचे मला आढळून आले. भारतीय संगीत ऐकताच मी नाचू का लागतो याचे गुपित मला आता कळले आहे असेही राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे मिश्किलपणे म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवर खळखळून हसले.
मला इथे (भारत) आल्याचा अभिमान आहे. मी काही मोठा राजकारणी नाही किंवा चांगला मुत्सद्दीही नाही, मी जे काही बोलतो ते माझ्या मनातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडते. मला इथे येऊन अगदी काहीच् दिवस झाले आहेत, पण मी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व शैलीतून आणि भारत देशाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणातून खूप काही शिकलो आहे. गरीबी निर्मूलन आणि दुर्बल घटकांना मदत करण्याचे त्यांचे कार्य एक देश म्हणून आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. असेही ते सरते शेवटी म्हणाले. त्यांनी भारताच्या समृद्धी आणि शांततेसाठी शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या भविष्यात भारत, इंडोनेशिया आणि ग्लोबल साऊथमधील संबंध अधिक दृढ होत जातील अशी आशा व्यक्त केली.