बँक निफ्टी ५०० अंकांनी वधारला
मुंबईः मंगळवारी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २९३ अंकांनी वाढून ७५,६५९वर उघडला तर निफ्टी १३१ अंकांनी वाढून २२,९६० वर उघडला. केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे आज मंगळवारी बाजारात चांगलीच तेजी दिसून आली.
सिस्टमध्ये रोकड वाढवण्यासाठी आरबीआयकडून आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ओपन मार्केट ऑपरेशन्सद्वारे ६० हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान ३ टप्प्यांत खरेदी होईल.
निफ्टीवर श्रीराम फायनान्स, अॅक्सिस बँक, विप्रो, एचडीएफसी बँक, ट्रेंट या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. त्याचवेळी फार्मा शेअर्समध्ये किंचित घसरण दिसून आली. सन फार्मा, डॉ. रेड्डी, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
सेन्सेक्सवर अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, इन्फोसिस या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
चीनच्या बाजारपेठा ४ फेब्रुवारीपर्यंत बंद आहेत.
कोरिया आणि तैवानमधील बाजारपेठाही आज बंद आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या आणि दोन दिवस चालणाऱ्या अमेरिकन फेडच्या बैठकीकडेही जागतिक बाजारांचं लक्ष असणार आहे. उद्या रात्री उशिरा व्याज दरांबाबत निर्णय होईल.