प्रयागराज : महाकुंभमेळ्यात पुन्हा अग्नितांडव : सेक्टर-२२ मध्ये अनेक तंबू जळून खाक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th January, 03:39 pm
प्रयागराज : महाकुंभमेळ्यात पुन्हा अग्नितांडव : सेक्टर-२२ मध्ये अनेक तंबू जळून खाक

प्रयागराज :  प्रयागराज महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर-२२ मध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. आग अनेक पंडालमध्ये पसरल्याने जत्रेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागली त्या ठिकाणी एकही भाविक उपस्थित नव्हता ही दिलासादायक बाब आहे. यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तपास सुरू आहे.सातत्याने आग लागण्याच्या घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या धार्मिक कार्यक्रमात कोट्यवधी भाविक सहभागी होत  असल्याने अशा घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

महाकुंभ प्रशासनाने या आगीच्या घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत . लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. यापूर्वी १९ जानेवारीला सेक्टर-१९ मध्ये आग लागली होती, त्यात गीता प्रेसचे १८० तंबू जळून खाक झाले होते. या घटनेत गॅस गळतीमुळे आग लागली होती. गीता प्रेस कॅम्पमध्ये चहा बनवत असताना एका छोट्या गॅस सिलिंडरमधून गळती झाली, त्यामुळे आग लागली. या आगीत दोन सिलिंडरही फुटले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


हेही वाचा