मुग्गुबाई मुग्गुबाई

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
6 hours ago
मुग्गुबाई  मुग्गुबाई

मूग, वाटाणा, हरभरा, चवळी, मसूर, मटकी, कुळीथ, उडीद ही कडधान्ये तुम्हाला माहीत आहेत ना?? ही कडधान्ये तुम्हाला ओळखतासुद्धा यायला हवीत हा. नाहीतर होईल असं की ताटात  मुगाची आमटी वाढलेली असेल आणि कोणी जर विचारलं आज आईने काय बनवलंय तर तुम्ही सांगाल मटकीची आमटी… आणि तुमचं उत्तर ऐकून आजी, ताई आणि दादा खदखदा हसतील. त्यामुळे आज लगेच स्वयंपाक घरात जाऊन कडधान्ये ओळखायला शिका. या कडधान्यांची आमटी, उसळ असे विविध पदार्थ आपण खातो. तुम्हाला माहितीये का या सर्व कडधान्यांपैकी मूग हे सर्वात श्रेष्ठ आहेत असे आयुर्वेदात सांगितले आहे. असे हे कडधान्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या मुगाचे पदार्थ तुम्ही खाता ना???

मूग सर्वात श्रेष्ठ असण्याचं एक महत्त्वाचं कारण सुद्धा आहे. ते कारण असं की सगळी कडधान्ये पचायला जड असतात म्हणजेच ती पचवायला आपल्या पचनसंस्थेला खूप शक्ती वापरावी लागते. परंतु मूग मात्र सहज पचवले जातात. त्यामुळे जे पदार्थ पचवायला सोपे ते पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात. 

तुम्ही मुगाचे कोणकोणते पदार्थ खाल्ले आहेत आठवा बरं... मूग तसेच मूगडाळ वापरून अनेक पदार्थ बनवले जातात, जसे की मुगाच्या गाठी, मूगडाळीचे वरण, मूग डाळ हलवा, मुगाच्या पीठाचे लाडू, करंज्या, मूगडाळ पकोडे, मुगाचा डोसा किंवा धिरडे, उसळ, मुगाचे गोड कण्ण इ. 

आयुर्वेदात तर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असे मुगाचे सूप बनवून प्यायला सांगितले आहे. आजारी असताना मुगाचे सूप प्यायल्याने तरतरी येते, थकवा नाहीसा होतो, ताकद येते आणि हे सूप पचायला अगदी सोपे असल्यामुळे पचनशक्तीवर ताण सुद्धा येत नाही.

मुगाचे पदार्थ निरोगी असताना तसेच आजारी असतानासुद्धा खाऊ शकता. पण आजारी असताना मात्र मुगाचे गोड धोड पदार्थ न खाता पचायला सोपे असे मुगाचे सूप, मूगडाळ तांदळाची साधी खिचडी किंवा उसळ असे पदार्थ खावे. मूग नेहमी खाण्यासाठी योग्य आहे असे आयुर्वेदाचार्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सारखं सारखं छोले आणि वाटण्याचा रोस न खाता मुगाचे पौष्टिक तसेच आरोग्यदायी पदार्थ खा आणि निरोगी रहा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य