भारत सरकारचे अवर सचिवांकडून अधिसूचना जारी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य नागरी सेवेतील अमरसेन राणे, लेव्हिन्सन मार्टिन्स आणि सुनील मसूरकर या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयएएसपदी बढती देण्यात आली आहे. भारत सरकारचे अवर सचिव संजय कुमार चौरासिया यांनी शुक्रवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
राणे, मार्टिन्स आणि मसूरकर यांनी राज्य प्रशासनात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यानंतर आता त्यांना आयएएसपदी बढती देण्यात आली आहे. यापूर्वी राज्यातील संजीव गडकर, यतींद्र मराळकर, संजीत रॉड्रिग्स, प्रसन्ना आचार्य, संदीप जॅकीस आदी अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने आयएएसपदी बढती दिली आहे. यातील संजीत रॉड्रिग्स आणि प्रसन्ना आचार्य यांची विविध राज्यांमध्ये सेवा बजावल्यानंतर गोव्यात बदली झाली आहे. यतींद्र मराळकर आणि संजीव गडकर हे अधिकारी अनुक्रमे लेह लडाख आणि जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत आहेत. याशिवाय संदीप जॅकीस गोव्यातच सेवा देत आहेत. या अधिकाऱ्यांनंतर केंद्राने आता अमरसेन राणे, लेव्हिन्सन मार्टिन्स आणि सुनील मसूरकर या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयएएसपदी बढती दिली आहे.