पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांची माहिती
बेळगाव : कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सरकारी वाहनाला झालेला अपघात हा कार चालकाने कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात घडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु आता पोलीस तपासात तो अपघात 'हिट अँड रन'चा प्रकार असल्याची बाब उघडकीस आली आहे.
या बाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी दिली असून एका कॅँटरने हेब्बाळकर यांच्या वाहनावर धडक दिली, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून त्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी पहाटे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, त्यांचे भाऊ आणि आमदार चन्नराज हत्तीहोली, त्यांचे अंगरक्षक बंगळुरूहून बेळगाव येथे परतत असताना ही घटना घडली असून या अपघातात सर्व प्रवासी जखमी झाले.
रस्ता ओलांडणाऱ्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले मात्र पोलीस तपासात कॅन्टरने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर सदर कॅँटरचा चालक पळून गेला असून त्याच्यावर 'हिट अँड रन'चा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एसपी गुलेद यांनी दिली. दरम्यान कॅँटर चालकाचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.