चांगल्या पर्यटनाची जबाबदारी निश्चित करावी!

Story: अंतरंग |
16 hours ago
चांगल्या पर्यटनाची जबाबदारी निश्चित करावी!

मागील दोन आठवडे गोव्यात घडलेल्या विविध घटनांनी देशभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. कळंगुटमध्ये जलसफरीची बोट उलटून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर ईडीएममध्ये अमलीपदार्थांचे सेवन केल्याचे संशय असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. नववर्षाच्या आदल्या दिवशी कळंगुट येथील शॅक कर्मचाऱ्यांनी आंध्र प्रदेशमधील एका तरुणाला काठ्यांनी बडवून काढले. यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच कळंगुट येथील अन्य एका शॅकमध्ये मुंबई येथून आलेल्या पर्यटकांना मारहाण करण्यात आली. या घटना राज्यात पुन्हा उभारी घेऊ पाहणाऱ्या पर्यटनाला मारक ठरू शकतात. 

अशातच गेले काही महिने सध्या काही सोम्या गोम्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर गोवा पर्यटन स्थळ म्हणून कसा खराब होत चालला आहे असा अपप्रचार करत आहेत. दिल्लीतील राष्ट्रीय वाहिन्यांचे अँकर देखील आता त्याची री ओढत आहेत. खरी परिस्थिती काय आहे, नाताळ, नववर्षाच्या निमित्ताने उत्तर गोव्यातील किनारी भागात किती गर्दी होती, गोव्यातील पर्यटक कमी झाले म्हणून आपण जी आकडेवारी दिली होती ती अधिकृत होती का, या व अशा कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्यांनी बेजबादारपणे व्हिडिओ अपलोड केले. त्यांची माहिती चुकीची असली तरी वरील घटनांमुळे या इन्फ्लूएन्सरना आयते कोलीत मिळत आहे.  

अर्थात राज्यातील पर्यटन क्षेत्रात सर्व काही आलबेल आहे हे देखील मान्य करायला हवे. राज्यात टॅक्सीचे दर हे सामान्य पर्यटकांना परवडणारे नाहीत हे मान्य करायला हवे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्याने पर्यटकांकडे महाग टॅक्सी घेण्याशिवाय पर्याय नाही. शॅक, जलक्रीडा किंवा हॉटेलमध्ये पर्यटकांना लुबडण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. या क्षेत्रातील भागधारकांनी स्वतःची सोय बघण्यापेक्षा पर्यटकांची सोय बघावी. अर्थात अशा काही घटनांमुळे राज्यातील सर्व टॅक्सी, हॉटेल किंवा शॅक चालक वाईटच आहेत असा चुकीचा प्रचार सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरनी बंद करायला हवा. 

राज्यात येणाऱ्या काही पर्यटकांसाठी गोवा म्हणजे दारू पिऊन दंगा करणे, वेश्यागमन करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे, किनाऱ्यांवर गाड्या चालवणे हेच समीकरण बनले आहे. गोव्यात 'सगळे' चालते, या मानसिकतेमुळे गोव्याची बदनामी होत आहे, यात वाद नाही. मात्र अशी मानसिकता का आणि कुणामुळे तयार झाली, ती कशी बदलता येईल, याचाही विचार झाला पाहिजे. अशा अनुभवामुळे देशी पर्यटक नकोच, केवळ विदेशी पर्यटकच हवेत अशी अट घालून चालणार नाही. सर्व देशी पर्यटक वाईट असे सामान्यीकरण करून देखील चालणार नाही.

गोवा पूर्वीप्रमाणे शांत, सुंदर राहिलेला नाही. तो सर्वच बाबतीत प्रदूषित झाला आहे. याबाबत रडगाणे गाण्याऐवजी चांगल्या पर्यटनाची जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे. पर्यटन राज्य म्हणवून घेताना त्या अनुषंगाने येणाऱ्या वाईट गोष्टींचा बंदोबस्त करणे ही जबाबदारी सरकारची आहे. तसेच जागरूक समाज म्हणून सर्व वाईट गोष्टींना विरोध करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

- पिनाक कल्लोळी