शेअर बाजार गुंतवणुकीत गोमंतकीय महिला आघाडीवर

एकूण गुंतवणूकदारांमध्ये ३२.२ टक्के वाटा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
शेअर बाजार गुंतवणुकीत गोमंतकीय महिला आघाडीवर

पणजी : गेल्या काही वर्षांत संपूर्ण देशातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत आहे. यात गोमंतकाचे नावही पुढे येत आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत गोमंतकीय महिला देशात आघाडीवर आहेत.       

नोव्हेंबर २०२४ अखेर गोव्यातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या एकूण गुंतवणूकदारांपैकी ३२.२ टक्के या महिला होत्या. महिला गुंतवणूकदारांची राष्ट्रीय सरासरी २४ टक्के इतकी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.      

मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२४ अखेरीस गोव्यातून एकूण २ लाख ३६ हजार जणांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. यातील ७५ हजार ९९२ महिला तर १ लाख ६० हजार ८ पुरुष (६७.८ टक्के) आहेत. मागील चार वर्षांत गोव्यातील महिला गुंतवणूकदारांची टक्केवारी वाढत गेली आहे. २०२१-२२ ही टक्केवारी २९.८ इतकी होती. तर २०२२-२३ मध्ये ३०.३ टक्के तर २०२३-२४ मध्ये ती वाढून ३१ टक्के इतकी झाली.   

गुंतवणुकीत गोव्यानंतर मिझोरामचा क्रमांक

 नोव्हेंबर २०२४ अखेरीस गोव्यानंतर मिझोराम येथे ३१.४ टक्के महिला गुंतवणूकदार आहेत. यानंतर आसाम (२९.८ टक्के), सिक्किम (२९.४ टक्के), नागालँड (२८.१ टक्के), महाराष्ट्र (२७.९ टक्के), तामिळनाडू (२७.६ टक्के), गुजरात (२७.५ टक्के) या राज्यांच्या क्रमांक लागतो. 

 केंद्र शासित प्रदेशांत चंदिगढ (३१.७ टक्के), दिल्ली (२९.९ टक्के), पुद्दुचेरी (२८ टक्के) येथे महिला गुंतवणूकदारांची टक्केवारी अधिक आहे.   

महिला गुंतवणूकदारांच्या टक्केवारीत वाढ      

अहवालानुसार मागील चार वर्षांत संपूर्ण देशात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या महिलांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. २०२१-२२ ही टक्केवारी २२.७ इतकी होती. तर २०२४-२५ मध्ये (नोव्हेंबर अखेरीस) ती वाढून २४ टक्के इतकी झाली आहे.