राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याचे निश्चित
पणजी : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अनुषंगाने तीन महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दोन पथके गोव्यात पाठवली होती. या पथकांनी मंत्री, आमदारांच्या कामाचा आढावा घेऊन त्याबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय नेतृत्वाला सादर केलेला आहे. त्यानुसार पुढील काहीच दिवसांत राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने रविवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
गत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतरच्या काळात केवळ एकदाच मंत्रिमंडळ फेरबदल होऊन काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर विद्यमान मंत्रिमंडळातील आणखी दोन मंत्र्यांची गच्छंती करून त्यांच्याजागी नव्या आमदारांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दोन पथकांना काही दिवसांसाठी गोव्यात पाठवले होते.
मंत्री आणि भाजप आमदारांनी गेल्या अडीच वर्षांत केलेली कामे, त्यांचा लोकांशी असलेला संपर्क तसेच त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश या दोन पथकांना देण्यात आलेले होते. त्यानुसार, या पथकांनी मंत्री, आमदारांच्या कामगिरीची आढावा घेऊन सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत हालचाली सुरू केल्या असून, पुढील काहीच दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल होईल, असे या नेत्याने सांगितले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आल्यानंतर मंत्री बनण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजप आमदारांमध्ये आनंदोत्सव पसरला आहे. तर, मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत केवळ चर्चाच झडत असल्यामुळे भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमावस्था पसरली आहे.