पणजी : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द केली. आता इयत्ता ५वी आणि ८वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाता येणार नाही. आता हे धोरण गोव्यात लागू करण्यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) नियमांमध्ये सुधारणा करावी लागेल. गोव्यात चौथी आणि आठवी सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्थांना तसेच सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे झिंगडे यांनी सांगितले. गोवा सरकारने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नियम तयार केले आहेत. नियमांमध्ये कोणत्याही सुधारणा करण्यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक असेल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे कोणतेही परिपत्रक किंवा आदेश शिक्षण विभागाला मिळालेले नाही, असे झिंगडे यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय स्तरावर पहिली ते पाचवी इयत्ता हा प्राथमिक स्तर आहे. माध्यमिक स्तर सहावी ते आठवी इयत्ता आहे. त्यामुळे केंद्राने इयत्ता पाचवी आणि आठवीचे सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक स्तर आहेत. यामुळे गोव्यातील चौथीसाठीचे सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द करावे लागेल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय आहे तसा अंमलात आणता येणार नाही, असेही झिंगडे यांनी सांगितले.