इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द : पुन:परीक्षेची संधी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
24th December, 12:27 am
इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द केली आहे. आता इयत्ता ५वी ते ८वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाता येणार नाही. 

यापूर्वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात पदोन्नती दिली जात होती, मात्र आता असे होणार नाही. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल. विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला प्रवेश दिला जाणार नाही.            

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे धोरण संपल्यानंतर पाचवी ते आठवीमध्ये एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला दोन महिन्यांत परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. जर विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाला नाही तर त्याला पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. 

दिल्लीसह १६ राज्यांकडून यापूर्वीच धोरण रद्द

केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सैनिक शाळांसह केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ३,००० हून अधिक शाळांना हा नियम लागू होणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्रालयाच्या मते, शालेय शिक्षण हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे राज्ये याबाबत स्वत:हून निर्णय घेऊ शकतात. यापूर्वीच, दिल्लीसह १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांनी या दोन वर्गांसाठी ‘नो-डिटेंशन’ धोरण रद्द केले आहे.