जमिनीचे मालक, कायदेशीर वारसदारांनाच मिळणार दस्तावेज

पुराभिलेख खात्यातर्फे नव्या कायद्याचा मसुदा जारी : अन्य लोकांना खात्याच्या संचालकांची परवानगी गरजेची

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
जमिनीचे मालक, कायदेशीर वारसदारांनाच मिळणार दस्तावेज

पणजी : पुराभिलेख खात्याकडून जमिनीचे मालक किंवा कायदेशीर वारसदार असणाऱ्या व्यक्तींनाच त्या जागेचे दस्तावेज मिळणार आहेत. केवळ काही अत्यावश्यक कारणास्तवच अन्य लोकांना खात्याच्या संचालकांच्या परवानगीने असे दस्तावेज मिळवता येणार आहेत. याबाबत खात्यातर्फे नुकताच नव्या कायद्याचा मसुदा जारी करण्यात आला आहे. यावर आक्षेप किंवा सूचना देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.


मसुद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूचे दस्तावेज देखील केवळ त्या व्यक्ती किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना मिळणार आहेत. दस्तावेज मिळवण्यासाठी खात्याच्या संचालकांना लेखी अर्ज करावा लागणार आहे. सार्वजनिक दस्तावेज हे मायक्रो फिल्म किंवा डिजिटलच्या स्वरूपात उपलब्ध असतील तर मूळ स्वरूपातील नोंदी उपलब्ध करून दिले जाणार नाहीत. केवळ काही प्रकरणात संचालकांच्या परवानगीने मूळ नोंदी उपलब्ध होतील.

याशिवाय खासगी किंवा बिगर सरकारी संस्थांच्या ताब्यातील दस्तावेज मिळवण्यासाठी देखील मसुद्यात नवे बदल केले आहेत. यानुसार सरकारला अशा खासगी व्यक्तींकडून भेट किंवा अन्य स्वरूपात मिळालेले दस्तावेज केवळ मान्यता प्राप्त संशोधकांना उपलब्ध करून देण्यात येतील. दस्तावेज हे मायक्रो फिल्म किंवा डिजिटल प्रतिमांच्या स्वरूपात उपलब्ध असतील तर अपवाद वगळता ते संशोधकांना थेट हाताळता येणार नाहीत असे मसुद्यात स्पष्ट केले आहे. कोणतेही सार्वजनिक दस्तावेज दरवर्षी नोंदणी केल्याशिवाय किंवा त्याचा आढावा घेतल्याशिवाय नष्ट करता येणार नाहीत.