महासंचालक अलोक कुमार; पर्यटकांची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य
पणजी : सिद्दिकी उर्फ सुलेमान खानला क्राईम ब्रँचच्या कोठडीतून पलायन करण्यास मदत करणाऱ्या अमित नाईक या एका कॉन्स्टेबलमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनाला दोष देणे चुकीचे आहे. सुलेमानला पकडण्यासाठी गोवा पोलिसांनी गेले दहा दिवस केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि सुलेमानला पुन्हा अटक झाली, असे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी सोमवारी प्रुडंट वृत्तवाहिनीवरील ‘हेडऑन’ कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.
क्राईम ब्रँचच्या कोठडीतून पलायन केल्यानंतर जो व्हिडिओ जारी केला, त्यात त्याने आपल्याला बारा पोलिसांनी मदत केल्याचे स्पष्ट केले. ते ऐकूनच आपल्याला आश्यर्च वाटले. त्यानंतर आपण स्वत: या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ज्या सुलेमानला पकडण्यासाठी गोवा पोलिसांनी तीन महिने प्रयत्न केले होते, तेच पोलीस त्याला सोडवण्यासाठी कसे काय प्रयत्न करतील, हा सर्वात मोठा प्रश्न होता. त्यातून सुलेमानला पलायनात केवळ अमित नाईक या एकाच कॉन्स्टेबलने मदत केल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आलेले आहे, असे अलोक कुमार म्हणाले.
सुलेमान कोठडीतून पसार झाल्यानंतर त्याला पुन्हा अटक करणे हेच आमचे ध्येय होते. त्यासाठी त्याच्याबाबत सोशल मीडियाद्वारे व्हायरल होणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करून आम्ही विविध राज्यांमध्ये चौदा पथके तैनात केलेली होती. या काळात व्हिडिओ जारी करून त्याने संभ्रम निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. पण, केरळ पोलिसांच्या मदतीने त्याला पुन्हा अटक करण्यात गोवा पोलिसांना यश मिळालेले आहे. सुलेमान सध्या गोवा पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे त्याच्या चौकशीतून त्याच्या पलायनामागील सत्य निश्चित बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले.