सुलेमान अखेर गोवा पोलिसांच्या जाळ्यात!

केरळ पोलिसांच्या मदतीने आवळल्या मुसक्या; गुन्ह्यांतील सहभागावरून पत्नीलाही केली अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th December, 12:25 am
सुलेमान अखेर गोवा पोलिसांच्या जाळ्यात!

पणजी : गेल्या १३ डिसेंबर रोजी क्राईम ब्रँचच्या कोठडीतून पलायन केलेला जमीन हडप घोटाळ्यातील आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याला रविवारी केरळ पो​लिसांनी अटक केल्यानंतर गोवा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी त्याला गोव्यात आणून अटक केली. सुलेमानसह त्याच्या कृत्यांत सहभागी असल्याचा दावा करीत पोलिसांनी त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका खान हिलाही अटक करण्यात आले आहे.


गोव्यासह देशभरात बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप करण्यासह खुनाचे तेरापेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेल्या सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याला १२ नोव्हेंबर २०२३ रोजी गोवा पोलिसांनी हुबळी-कर्नाटक येथे अटक केली होती. त्यानंतर त्याला गोव्यात आणून त्याची रवानगी क्राईम ब्रँचच्या कोठडीत करण्यात आली होती. परंतु, कोठडीत असताना १३ डिसेंबरच्या रात्री २.३० च्या सुमारास कोठडीत सेवेत असलेल्या बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याच्या मदतीने सुलेमानने पलायन केले. त्यामुळे राज्यात खळबळ माजली.   संशयित अमित नाईक याची पणजी प्रथमश्रेणी न्यायालयाने शनिवारी सशर्थ जामिनावर सुटका केली होती. विरोधी पक्षांनी या विषयावरून सरकारला घेरत, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली.


सुलेमानने कोठडीतून पलायन करताच गोवा पोलिसांनी विशेष पथके स्थापन करून तत्काळ महाराष्ट्र, कर्नाटक, हैदराबाद, केरळ या राज्यांत पाठवली. सुलेमानने हुबळी येथे पलायन केल्याच्या संशयाने पोलिसांनी हुबळीत सापळा रचून त्याला पलायन करण्यास मदत करणाऱ्या अमित नाईक याला अटक केली. नाईक याला गोव्यात आणून त्याला पोलीस सेवेतून बडतर्फही करण्यात आले. त्यानंतर सुलेमान याला हुबळीतून पलायन करणाऱ्यास मदत करणाऱ्या हजरतसाब बवन्नवार यालाही पोलिसांनी हुबळीतून अटक करून गोव्यात आणले.