विजय सरदेसाईंची सरकार, मुख्यमंत्र्यांवरील टीका नैराश्येतून !

पर्रीकरांचा संदर्भ देत केलेल्या ट्विटवरून प्रदेश भाजपही​ आक्रमक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd December, 11:47 pm
विजय सरदेसाईंची सरकार, मुख्यमंत्र्यांवरील टीका नैराश्येतून !

पणजी : राजकीयदृष्ट्या व्यर्थ असलेले आमदार विजय सरदेसाई दुटप्पी आहेत. २०१७ पर्यंत त्यांनी नेहमीच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका केली. २०१७ मध्ये भाजपशी हातमिळवणी करून ते सरकारमध्ये आले. पण, २०१९ मध्ये त्यांना सरकारमधून हाकलण्यात आले. त्या नैराश्येतूनच ते भाजप सरकारवर वारंवार आरोप करीत असल्याची टीका प्रदेश भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी रविवारी केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राजस्थानमध्ये आयोजित केलेल्या जीएसटी आणि अर्थसंकल्पपूर्व बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चार्टर विमानाने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत तीन आमदारही उपस्थित होते. हाच विषय पकडून आमदार विजय सरदेसाई यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर निशाणा ​साधला. 

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर आमदारांनी केलेली विकासकामे पाहण्यासाठी दुचाकीवरून फिरत होते. विरोधी पक्षांच्या आमदारांना आदर देत होते. पण, सध्याचे मुख्यमंत्री चार्टर ​विमानाने ​फिरत आहेत. भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींमुळे राज्याची बदनामी होत असल्याचे ट्विट आमदार सरदेसाई यांनी केले होते.

सरदेसाई यांच्या ट्विटला वेर्णेकर यांनी सडेतोड उत्तर दिले. २०१९ मध्ये सरकारमधून हाकलल्याच्या नैराश्येतूनच विजय सरदेसाई भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहेत. परंतु, ज्यांचा आधार घेऊन ते टीका करीत आहेत, त्यांच्यावर २०१७ पर्यंत आपण काय आरोप केले होते याचा सरदेसाईंनी विचार केला पाहिजे, असेही वेर्णेकर यांनी नमूद केले.