मुख्यमंत्री प्रमोद सावंत : गावकर समाजाला आश्वासन
वाळपई : श्री भूमिका देवी मंदिराच्या राखणदार साखळेश्वरच्या पूजेवरून सुरू झालेल्या वादात उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचा आक्षेप घेत रविवारी गावकर समाजाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व काही कायदेशीर पद्धतीनेच होईल, असे आश्वासन दिले.
गावकर समाजाने घडलेल्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व काही कायदेशीर पद्धतीनेच होईल, असे आश्वासन दिले असल्याचे गावकर समाजाने सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व गोष्टी कायदेशीरपणे सुरळीत होतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गावकर समाजातील लोकांनी सांगितले.
शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे उत्सव शांततेत पार पडला. सध्या पर्ये देवस्थानच्या सभोवतालच्या भागामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी बंदोबस्त आहे.
पल्लवी मिश्रा यांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्यानुसार एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे शनिवारी साजरा होणारा पारंपरिक सप्ताह व रविवारी साजरा होणारा पारंपरिक गवळण काला यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पर्ये देवस्थान परिसरामध्ये १४३ कलम लावले होते.
पारंपरिक गवळण सप्ताह उत्साहात
पर्येतील श्री भूमिका साखळेश्वर देवस्थानाचा पारंपरिक गवळण सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. मंदिर बंद करणे व १४४ कलम लावण्यासह माजिक महाजन गटाच्या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी रात्रभर सुमारे एक हजार सेवेकरी महाजनांनी याला जोरदार विरोध केला. त्यानंतर सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घेतला. त्यामुळे शनिवारी पारंपरिक सप्ताह साजरा करण्यात आला.