‘ईव्ही’ नोंदणी टक्केवारीत गोवा देशात दुसरा

राज्यात २० हजार ३३० ईव्हींची नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd December, 11:42 pm
‘ईव्ही’ नोंदणी टक्केवारीत गोवा देशात दुसरा

पणजी : इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) नोंदणीची टक्केवारी अधिक असण्यात त्रिपुरा प्रथम तर गोवा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत झालेल्या वाहनांच्या नोंदणीत विद्युत वाहनांची (ईव्ही) टक्केवारी ६.२८ इतकी आहे. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री भूपतीराजू वर्मा यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली. याबाबत खासदार कार्तिकेय शर्मा यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वाहन पोर्टलवर गोव्यातून एकूण ३ लाख २३ हजार ७४८ वाहनांची नोंदणी झाली होती. यातील २० हजार ३३० (६.२८ टक्के) वाहने ही ईव्ही होती. या काळात त्रिपुरामध्ये २ लाख ६४ हजार ४ वाहनांची नोंदणी झाली होती. यातील २० हजार ११३ (७.६२ टक्के) वाहने ही ईव्ही होती.


संपूर्ण देशात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान १०.७५ कोटी वाहनांची नोंदणी झाली होती. यातील ३६.३९ लाख (३.३८ टक्के) वाहने ही ईव्ही होती. एकूण वाहनांच्या तुलनेत ईव्ही वाहनांच्या नोंदणीत गोव्यानंतर आसाम (५.७९ टक्के), कर्नाटक (४.८० टक्के), उत्तर प्रदेश (४.३४ टक्के), उत्तराखंड (४.३३ टक्के), केरळ (३.९९ टक्के), महाराष्ट्र (३.९७ टक्के) ही राज्ये असल्याचे उत्तरात म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झपाट्याने वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांशिवाय बॅटरी, सीएनजी आणि इतर पर्यायी वाहनांनाही देशात खूप पसंती दिली जात आहे.