आले अंतिम १५ चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश. ब्रिटीश-भारतीय दिग्दर्शिका संध्या यांच्या संतोष या चित्रपटाची एन्ट्री
नवी दिल्ली : ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री असलेला 'लापता लेडीज' हा चित्रपट ९७ व्या ऑस्कर पुरस्कार-२०२५ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंतिम १५ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने बुधवारी सकाळी ही घोषणा केली. मात्र, त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे ब्रिटीश-भारतीय दिग्दर्शिका संध्याचा 'संतोष' हा चित्रपट अंतिम १५ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. हा चित्रपट ब्रिटनचे प्रतिनिधित्व करणार आहे.
लापता लेडीज हा चित्रपट परदेशी श्रेणीतील पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता. भारतीय फिल्म फेडरेशनने २३ सप्टेंबर रोजी ऑस्करमध्ये पाठवण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले होते आणि आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आला होता. रवी किशन, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांटा आणि नितांशी गोयल यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये विजेते घोषित केले जातील.
हनुमान, कल्की २८९८ एडी, अॅनिमल, चंदू चॅम्पियन, सॅम बहादूर, स्वातंत्र वीर सावरकर, गुड लक, घरात गणपती, मैदान, झोरम, कोट्टुकाली, जामा, आर्टिकल 370, अट्टम, आदुजीविठम आणि ऑल वुई इमॅजिन हे चित्रपट ऑस्करसाठी नामांकनाच्या शर्यतीत होते. परंतु ज्युरीने लापता लेडीजच्या पदरात कौल टाकला. आत्तापर्यंत मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान या तीन चित्रपटांना ऑस्करच्या परदेशी चित्रपट श्रेणीत भारतातून नामांकन मिळाले आहे, परंतु एकाही चित्रपटाला पुरस्कार मिळू शकला नाही.