नाना पाटेकर हे ‘वनवास’ या नवीन चित्रपटासह येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गदर’ फेम अनिल शर्मा यांनी केले आहे. शर्मा तसे हाणामारीपटासाठी ओळखले जातात, परंतु ‘वनवास’द्वारे त्यांनी एक वेगळाच भावनिक कांगोरा टिपला आहे. त्याबद्दल नाना पाटेकर यांच्याबरोबर केलेली बातचीत...
‘वनवास’ या चित्रपटाबद्दल काय सांगाल?
जेव्हा तुम्ही एखादा खेळ पाहत असता, तेव्हा तो तुम्हाला नक्कीच आवडतो. परंतु खेळ पाहणे वेगळे आणि जे खेळाडू तो खेळ खेळत असतात, त्यांच्यासाठी ती एक मेहनत, जिद्द, महत्त्वाकांक्षा असते... जिंकण्याची. तसेच काहीस चित्रपटाबद्दल असते. आपण जेव्हा एखादा चित्रपट पडद्यावर पाहतो, तेव्हा ते सुंदर असे कथानक असते. परंतु त्या मागे पटकथा लिहिताना खूप सारी मेहनत असते. ‘वनवास’मध्ये म्हणून आम्ही कोणतेही आयटम गाणे, कोण्या मोठ्या चेहऱ्याला आत घुसवलेले नाहीये. मी माझ्या कोणत्याही चित्रपटाला प्रमोट करत नाही. मला वाटते प्रेक्षकांना चित्रपट आवडला तर तो माउथ पब्लिसिटीने दुसऱ्या प्रेक्षकांना सांगून, चित्रपटाला गर्दी होते. बऱ्याच ठिकाणी काही होर्डिंग देखील लागायचे आणि अशा या गोष्टींमध्ये चित्रपट चालायचे देखील. क्रांतिवीर, तिरंगा, अंकुश या आणि अनेक चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला होता. आयुष्याचे असे असते, आपल्याला बऱ्याच गोष्टी आवडत नसतात. तरीदेखील आपल्याला गप्प बसून ते सगळे सहन करावे लागते. आम्ही जेव्हा अभिनय शिकत होतो, तेव्हा आम्हाला जर एखाद्याचे काम आवडले नाही, तरी देखील त्या कलाकारासाठी टाळ्या वाजवायला सांगायचे. असेच काहीसे चित्रपटांचे आहे.
तुम्हाला शहर आवडत नाही, म्हणून तुम्ही गावखेड्यात राहायला गेलात ? कसे वाटते ते जीवन?
मला शहरातील जीवन अजिबात आवडत नाही. म्हणून मी गावात राहायला गेलो. तिकडे मी घरातल्या कामांबरोबरच घराबाहेरची, शेतीची कामे देखील करतो. भात शेती करण्यापासून, पालेभाज्या, फळभाज्या लावण्यापर्यंतची कामे करतो आणि मला त्याच्यात अतिशय आनंद मिळतो. मी सकाळी जेव्हा उठतो तो पक्ष्यांच्या किलबिलाटात कानावर पडतो. या सारखा दुसरा आनंद कोणता असेल. या सगळ्यामुळे मला बालपणात शिरल्यासारखे वाटते
तुम्ही स्वतः अभिनेता, दिग्दर्शक असल्याने तुम्ही सेटवर सतत सूचना देत राहता?
हो, मी तसे करतो. कारण तसे करणे मला आवडते. उत्कर्ष अतिशय नम्र आणि मेहनती मुलगा आहे. अभिनय देखील चांगलाच करतो. दिग्दर्शक हा चित्रपटाचा कप्तान असतो आणि तो त्याचे काम त्याच्याप्रमाणे उत्तम करतो. सेटवर जाण्यापूर्वी मला संपूर्ण स्टोरी माहित असते. त्याखेरीज इतर गोष्टी देखील मला ठाऊक असतात. म्हणून मी सूचना देत राहतो.
चित्रपट स्वीकारताना तुम्ही चुझी आहात असे समजते. पटकथेमध्ये तुम्ही काय पाहून चित्रपट स्वीकारता?
मी तसा सिलेक्टीव्ह नाही. परंतु कधीकधी मला ज्या चित्रपटांसाठी विचारणा होते, त्याच्यामध्ये मी तो चित्रपट स्वीकारावा असा एकही मुद्दा नसतो. मी स्वतःला सर्वसामान्य माणूस म्हणतो. त्यामुळे मला कोणी भूमिकेसाठी विचारतो, तेव्हा तो चित्रपट मला प्रेक्षक म्हणून पहायला आवडेल काय, एवढाच विचार करतो. मग मी तो चित्रपट स्वीकारतो. मी, अति हुशार किंवा पारितोषिक मिळवणाऱ्या चित्रपटाच्या कथानकाचा स्वीकारत नाही. चित्रपट हे मास माध्यम आहे, त्यामुळे जिथे मोठ्या प्रमाणात जनता चित्रपट पाहायला जाईल, असे विषय मी निवडतो. उदाहरणार्थ, ‘वेलकम’सारखा चित्रपट.
आता तुम्ही ‘वेलकम’ या चित्रपटाचे नाव घेतले म्हणून विचारते, ‘वेलकम’ या चित्रपटाचा पुढचा भाग तुम्ही करणार आहात का?
तो भाग करण्यास मी नकार दिला. मीच नव्हे तर अनिल कपूर यांनी देखील त्या चित्रपटाला नकार दिला आहे. कथानक मला आवडले नाही, तर मी चित्रपट स्वीकारत नाही. मला असे वाटते की, एखाद्या चित्रपटाचे कथानक, कलाकार म्हणून नाही आवडले तर ते सरळ नाही म्हणून सांगावे आणि तसे केल्याने तुमच्या फक्त पैशाचेच नुकसान आहे. परंतु मन मारून तरी का काम करावे? देवाच्या कृपेने मी भरपूर पैसे कमावले आहेत. एखाद्याला जगायला किती पैसे लागतात, ते आहेत माझ्याकडे.
रतन टाटा यांच्याप्रमाणे तुमच्या दान धर्माची चर्चा लोकांमध्ये होत आहे आणि तुमच्या त्या व्यक्तिमत्त्वाला सर्वसामान्य लोक पसंत करत आहेत?
मला त्याबद्दल अधिक काही बोलायचे नाही. मला वाटते नदी जेव्हा संथपणे वाहत असते तेव्हा ती अनेकांचा विकास करते. परंतु ती जेव्हा दुथडी भरून वाहू लागते तेव्हा ती रस्ते बदलते, ध्येय देखील बदलून टाकते आणि त्याचा शेवट हा विनाशक असतो. माझी तुलना रतन टाटा यांच्या बरोबर करू नका, कारण ते एक महान व्यक्ती म्हणून खूप मोठे होते. मी जे काय करतो, ते माझ्या वैयक्तिक आनंदासाठी. त्याच्यामुळे माझी आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही. या सगळ्या कामासाठी मला पारितोषिक वगैरे द्यावे, ही माझी अपेक्षा नाही आणि एकटा माणूस समाजसेवा करू नाही शकत. त्याची टीम असते पारितोषिक द्यायचे झाले तर सगळ्या टीमला द्यावे लागेल.
आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमधील तुमची आवडती भूमिका कोणती?
आतापर्यंत तरी माझी आवडती भूमिका अशी काही नाही. मी जेव्हा एखादी भूमिका स्वीकारतो, तेव्हा ती भूमिका तेवढ्यापुरती माझी आवडती असते. दुसरा चित्रपट करायला घेतला की ती भूमिका मागे पडते. एखाद्या भूमिकेबरोबर मला चित्रपट आवडतो. परंतु चित्रपट संपला की ती भागीदारी पण संपते. एखादी भूमिका केली तर ती आवडते असे कधी होऊ शकत नाही. कारण चाळीस-पन्नास दिवसाच्या चित्रीकरणाबरोबर आपण क्रूबरोबर त्या भूमिकेच्या प्रवासाला निघतो. चित्रपट संपला की तो प्रवासही संपतो.
‘वनवास’ या चित्रपटामध्ये तुम्ही वडिलांची भूमिका निभावत आहात. तुमच्या आईबरोबर असलेले तुमचे नाते सांगाल, कारण तुम्ही त्यांची खूप काळजी देखील घेत होता?
आपल्या पालकांची काळजी घेणे काही मोठी गोष्ट नाही. मला वाटत आपल्या प्रत्येक जणाचे ते कर्तव्य आहे. त्यामध्ये मी काही मोठे केले, वेगळे केले असे नाही. माझी आई वयाच्या ९९ व्या वर्षी वारली आणि आम्ही सात भावंडे. आता तर सगळेच वारले. मी फक्त एकटा काय तो जिवंत आहे. माझ्या आईने आपला पती आणि मोठा मुलगा गमावला. त्याचे तिला अपार दुःख झाले. परंतु त्या दुःखाचा तिने कधी डोंगर केला नाही. ती नेहमी आयुष्यामध्ये आशावादी राहिली. पुढे काम कसे करायचे, आता जी मंडळी जिवंत आहेत, त्यांच्यावर तिचे लक्ष असायचे. मी तिला कधी रडताना पाहिले नाही. खरे सांगायचे तर वनवास मधील माझ्या भूमिकेसाठी मी तिच्यामधलेच काही भावगुण घेतले आहेत. बरेचदा भूमिका निभावत असताना आपल्या अवती-भवती जे लोक आहेत, त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत असतो
तुमच्या कोणत्या भूमिकेने तुमच्यामध्ये बदल घडवला किंवा तुम्हाला घडवले असे वाटते?
मला प्रवास करायला फार आवडते. त्यातही रिक्षाचा प्रवास मला फार आवडतो. रिक्षाने तुम्हाला आजूबाजूचे बरच काही पाहता येते, समजून घेता येते. सुरुवातीला रिक्षावाले मला फार घाबरायचे. मी त्यांना पाचच मिनिटात कम्फर्टेबल करायचो आणि मग आमच्या गप्पांना सुरुवात व्हायची. याप्रकारे मला रिक्षावाला हा माणूस म्हणून किती मेहनत करतो, त्याचे जीवन कसे असते. त्यांना काय काय अडचणीला सामोरे जावे लागते, ते मला समजून आले.
वनवास मधील तुमची भूमिका ही नटसम्राट सारखी वाटते?
अजिबात नाही. दोन्ही भूमिका वेगळ्या आहेत. त्यात एकच सामान्य धागा आहे आणि तो म्हणजे, दोन्ही चित्रपटांमध्ये मी वडिलांची भूमिका केली आहे. मात्र दोन्ही चित्रपटांची कथानके फार वेगळी आहेत.