हैदराबाद : अलीकडेच, हैदराबादच्या संध्या थिएटरबाहेर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी कारवाई करत अभिनेता अल्लू अर्जुनला ताब्यात घेतले आहे.
४ डिसेंबरला संध्या थिएटरमध्ये पुष्पा-२ चा प्रीमियर सुरू होता. अल्लू अर्जुन यावेळी संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आला होता. यामुळे चाहते अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी उत्सुक होते. त्याच्यासोबत मोठ्या संख्येने चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थिएटरमध्ये मोठी गर्दी जमली आणि त्यानंतर लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गर्दी कमी झाल्यानंतर गुदमरल्यामुळे बेशुद्ध झालेल्या लोकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले होते.
या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन, अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अल्लू अर्जुन या ठिकाणी येणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना नव्हती असे येथील एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही एक व्हिडिओ जारी करत महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता. त्याने २५ लाखांची मदत देण्याचे आश्वासन देत जखमींवरही स्वखर्चाने उपचार करू असे अल्लू अर्जुनने म्हटले होते. मृत रेवतीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत त्यांची भेटही घेतली होती.