‘आज की रात’ गाण्यामुळे निर्माण झाला चाहत्यांशी अनोखा बंध

Story: मुलाखत । हर्षदा वेदपाठक |
20th December, 12:21 am
‘आज की रात’ गाण्यामुळे निर्माण झाला चाहत्यांशी अनोखा बंध

प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया हल्ली कमी काम करताना दिसत आहे. त्यामागे ती लग्न बंधनात अडकणार आहे, अशी एक अफवा आहे. हिंदीतून साऊथमध्ये गेलेली तमन्ना, साऊथ इंडस्ट्रीजमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तेथील भाषा देखील तिने आत्मसात कल्या आहेत. आज ती दाक्षिणात्य आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीजमधील चर्चेतील चेहरा आहे. तिच्या एकूण प्रवासाबाबत तिच्याशी केलेली ही बातचित...       



आम्ही बरेच दिवस तुझ्या लग्नाच्या बातम्या ऐकत आहोत, याबाबत तू काय सांगशिल?      

 सध्या मी माझ्या कामात व्यस्त आहे, त्यामुळे तशी माझी कोणतीही योजना नाही. सध्या मी एकटी खूप खूश आहे, तुम्ही मला सुखी पाहू इच्छित नाहीत का?       


 तू बॉलिवूडमध्ये सुरुवात केली होती, मग तू साऊथकडे वळलीस, साऊथ इंडस्ट्री म्हणजे बाॅलीवूडचे तिकीट आहे काय?      

 माझा कधीच पोर्टफोलियो नव्हता. मी २००५ मध्ये १४ वर्षांची असताना ‘चाँद सा रोशन चेहरा’ हा चित्रपट केला होता. पण तो चित्रपट काही चालला नाही. नंतर मी दक्षिणेकडे वळले. साऊथ इंडियन सिनेमात काम करून बॉलिवूडचे तिकीट मिळते, यावर माझा विश्वास नाही. हो मी टॉलीवूड इंडस्ट्रीकडून चांगल्या ऑफर्स मिळवल्या आणि म्हणून मी तिथल्या चित्रपटांची निवड केली. एक गोष्ट स्पष्ट आहे, साऊथ इंडियन सिनेमात काम करताना मला कोणत्याही ऑडिशन टेस्टचा सामना करावा लागला नाही. मी कोणतेही होमवर्क केले नाही. मी दक्षिणेत २४ चित्रपट केले आहेत आणि तेथील यशाने मी खूश आहे.      

 

भविष्यात तू कोणत्या प्रकारचे चित्रपट करणार आहेस?      

 मी सर्व प्रकारचे चित्रपट करू इच्छिते. त्यामुळे तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याच्या संधी मिळते. मी वेगवेगळे चित्रपट करू इच्छिते. मी एक साधी मुलगी आहे आणि माझ्यासाठी माझे कुटुंब महत्त्वाचे आहे. जर मला माझ्या पालकांचा मला पाठिंबा मिळला नसता तर मी कधीही अभिनेत्री झाली नसती, तेच माझे जग आहे. मला वाटते की व्यावसायिक सिनेमा हा सर्वांत मोठे आव्हान आहे. अभिनेत्यांना व्यावसायिक चित्रपटांशी जोडले जावे लागते, कारण लोक त्यांच्याशी थेट जोडले जातात.       


 तुला वाटते की, आजकाल चांगल्या पटकथांचा अभाव आहे, म्हणून चित्रपट चालत नाहीत? 
मला वाटते की, चित्रपट हा एक संयुक्त प्रयत्न आहे. पूर्ण प्रयत्नाशिवाय तुम्ही कोणतीही कला विकसित करू शकत नाही. माझ्यासाठी पटकथा म्हणजे पूर्ण चित्रपट नाही. आम्ही कथा ऐकतो. पण त्याशिवाय इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. एक व्यक्ती कधीही चित्रपट बनवू शकत नाही. त्याला चांगली पटकथा, चांगला दिग्दर्शक, छायाचित्रकार, गायक, संगीतकार, अभिनेते आणि बरेच काही लागते.      


 तुला चित्रपटाची ऑफर मिळाल्यावर तू निर्णय कसा घेतेस?      

 माझ्यासाठी केवळ कथा चांगली असणे महत्त्वाचे नाही, दिग्दर्शकही चांगला असायला हवा. प्रेक्षकांनी पडद्यावर चित्रपट पाहत असताना स्वतःला विसरून गेले पाहिजे. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवनाबद्दल जरासुद्धा विचार करता नये, मी अशाच चित्रपटांच्या शोधात असते. मी मुंबईची आहे आणि दक्षिण भारतात काम केले आहे. मी अनेक भूमिका केल्या आहेत, पण ‘सिकंदर का मुक्कदर’ या चित्रपटातील भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. नीरज सर वेगळ्या प्रकारचे दिग्दर्शक आहेत. मला पडद्यावर संवेदनात्मक भूमिका करायला फारसे आवडत नाही. मला थ्रिलरमध्ये भूमिका साकारणे, खूप मनोरंजक वाटते.      


 सध्याच्या चित्रपटांबद्दल तुझे काय मत आहे?      

 आपण काय करत आहोत, हे आपल्याला कधीकधी माहित नसते. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे आणि आज आपण ७ सेकंदांच्या कंटेंटपासून १०० सेकंदांपर्यंत जात आहोत. आमची कला तंत्रज्ञानाशी जळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. संस्कृती बदलत आहे. करोनामुळे आपल्या जीवनात खूप बदल झाले आहेत. आपण स्वतः कठोर बनलो आहोत. आपल्याभोवती सर्व काही खूप बदलले आहे आणि सिनेमाही बदलला आहे. मला वाटते, हा आपल्यासाठी परिवर्तनाचा काळ आहे. मला वाटते आपल्याला नेहमीच चांगल्या कथांचा अभाव होता. जर आपल्याकडे खूप चांगल्या कथा असत्या, तर आपल्याला त्याची किंमत कळली नसती. त्यामुळे प्रत्येकाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत आहे. केवळ अभिनेतेच नव्हे, तर लेखक आणि इतरांच्याही कलेचा कस आज लागत आहे.      


 एका वरिष्ठ अभिनेत्रीने नुकतीच ओटीटीवर टीका केली आहे, याबद्दल तुझे काय मत?      

 प्रेक्षकांना आपण काय दिले पाहिजे, त्यातून आपल्याला काय निवडायचे, हे आपल्यावरच आहे. मग तक्रार का? ज्या गोष्टी करण्यात तुला रस नाही, त्या नाकारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.


 चित्रपटगृह किंवा ओटीटी यामध्ये कोणतीही एक गाेष्ट निवडायची असेल तर तू कोणती निवडशिल?   

 नक्कीच चित्रपटगृह. पण मी खूप भाग्यवान आहे की, या वर्षाची सुरुवात चांगली झाली. वर्षाच्या सुरुवातीला माझ्या तमिळ चित्रपट ‘अरण्मनाई ४’ने १०० कोटी कमावले. कोणत्याही भाषेत डब न केलेला स्त्री केंद्रित पहिला तमिळ चित्रपट आहे, ज्याने एवढी कमाई केली. हे माझ्यासाठी खूप खास आहे. असे चित्रपट केल्यावर आपल्याला कळते की प्रेक्षकांना कोणते चित्रपट आवडतात. मी खूप भाग्यवान आहे की मला चित्रपटगृह आणि ओटीटी दोन्हीवर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हा माझ्यासाठी एक उत्तम काळ आहे, कारण मी ज्या गोष्टींची अपेक्षा केली होती, त्या सर्व पूर्ण झाल्या आहेत. 


 तू चित्रपटांमध्ये संगीताला किती महत्त्व देतेस? स्री २ मधील तुझा डान्स नंबर खूप गाजत आहे, याबद्दल काय सांगशिल?      

 मला वाटते भारतीयांसाठी संगीत एक महत्त्वाचा आणि शक्तिशाली घटक आहे. स्री मधील गाणे खूप गाजले. त्यावर मला माझ्या मित्रांनी, वडिलांनी आणि कुटुंबाने माझे खूप कौतुक केले. या गाण्यामुळे माझा माझ्या चाहत्यांशी एक नवीन बंध निर्माण झाला. मला ते गाणे आवडले आणि माझ्या चाहत्यांना मला त्या गाण्यात पाहताना आवडले, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.


 दिया मिर्झाने सांगितले होते की, तिच्या सौंदर्यामुळे ती अनेक भूमिकांपासून वंचित राहिली, याबाबत काय सांगशिल?

 सौंदर्य आणि एखाद्याला आकर्षित करण्याची क्षमता, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला वाटते कला म्हणजे फक्त सौंदर्याचा दिखावा नाही. ते काहीतरी असे आहे जे तुम्हाला आकर्षित करते. काहींसाठी ते काव्यमय असू शकते. काहींसाठी वेदनादायकही ठरू शकते. त्यामुळे दिया असे बोलली असावी.     


 दक्षिणात्य चित्रपटांमधील तुझे येणारे चित्रपट कोणते?      

 तेलुगूमध्ये मी सध्या ‘ओडेला २’ नावाचा एक चित्रपट करत आहे आणि मी त्याची शूटिंग सुरू केली आहे, तो एक थ्रिलर आहे. तसेच मी ‘डेरिंग पार्टनर्स’ नावाची एक वेब सिरीज​ करत आहे. कॉलिन आणि अर्चित त्याचे दिग्दर्शक आहेत आणि मी त्यात डायना पेंटीसोबत काम करत आहे. या शिवाय अनेक प्रोजेक्टवर सध्या मी विचार करत आहे.

हेही वाचा