'या' कारणास्तव 'पुष्पा- २' चे निर्माते अडकले वादाच्या भोवऱ्यात, करणी सेना म्हणतेय चित्रपट निर्मात्यांना चोप दिला जाईल !
नवी दिल्ली :अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मीका मंदाना यांचा बहुचर्चित 'पुष्पा -2' काही दिवसांपूर्वी चित्रपट गृहात दाखल झाला. अल्लू अर्जून आणि रश्मीका या जोडगोळीसोबतच दिग्दर्शक सुकुमार यांचा कलात्मक अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावाला आहे. चित्रपट प्रदर्शनापासून चांगलाच चर्चेत असून तिकीटबारीवर दमदार कामगिरी करणाऱ्या या चित्रपटासंदर्भातील काही वाद सुरु झाले आहेत.
एका महिला चाहतीचा सिनेमागृहाबाहेरील चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याने अभिनेता अल्लू अर्जूनसहीत निर्मात्यांवर टीका झाल्यावर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना घरात घुसून मारण्याची धमकी करणी सेनेनं दिली आहे. राजपूत समाजाचे नेते राज शेखावत यांनी रविवारी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या निर्मात्यांना धमकी दिली आहे.
अल्लू अर्जून आणि रश्मिका मंधाना यांचा हा चित्रपट क्षत्रियांचा अपमान करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये फहाद फैसीलने भवर सिंह शेखावत नावाची पोलीस अधिकाऱ्याची नकारात्मक भूमिका साकारली आहे. याच भूमिकेवर आता करणी सेनेच्या नेत्यांची आक्षेप नोंदवला आहे.
करणी सेनेचे नेते राज शेखावत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन, पुष्पा 2 मध्ये असलेल्या शेखावत नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या नकारात्मक भूमिकेवरून चित्रपट निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. "या चित्रपटाने क्षत्रियांचा अपमान केला आहे. शेखावत समाजाला नकारात्मक दृष्टीकोनातून दाखवण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली इंडस्ट्री शेखावत समाजाला बदनाम करत आहे. त्यांनी आता पुन्हा तेच केलं आहे," असं राज शेखावत यांनी म्हटलं आहे. "या चित्रपटामध्ये वारंवार वापरण्यात आलेला शेखावत शब्द निर्मात्यांनी वगळावा. नाहीतर करणी सेना त्यांच्या घरात घुसून त्यांना मारेल. गरज पडल्यास आम्ही काहीही करु शकतो," असा इशारा राज शेखावत यांनी दिला आहे.
पुष्पा-२ हा मूळ तेलगू भाषेतील चित्रपट असून तो वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना हे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर प्रेक्षक पुष्पा-२ ची वाट पाहत होते. आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.