‘डिस्पॅच’मध्ये अनुभवा शोध पत्रकारितेचे जग : मनोज वाजपेयी

Story: मुलाखत । हर्षदा वेदपाठक |
05th December, 11:13 pm
‘डिस्पॅच’मध्ये अनुभवा शोध पत्रकारितेचे जग : मनोज वाजपेयी

सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी, चित्रपट आणि डिजिटल या दोन्ही माध्यमामध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. ‘डिस्पॅच’ या त्याच्या आगामी थ्रिलरसह सज्ज झाला आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीप्राप्त मनोज वाजपेयी यांच्याशी केलेली बातचित...
डिस्पॅच’ बद्दल काय सांगाल?

एक पत्रकार जो वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील गुंतागुंतीचा छडा कशाप्रकारे लावतो ते कथानक या वेबसीरीज मध्ये आहे. ‘डिस्पॅच’ शोध पत्रकारितेचे जग तुमच्यासमोर आणून ठेवतो. हा इसम आपल्याला त्याच्या व्यक्तिरेखेच्या हृदयात डोकावून पाहायला लावतो आणि सोबत उलगडत जाणारे कथानक कथन करतो.
डिस्पॅच’ मधील भूमिकेला तुम्ही होकार का दिला?
माझ्यासाठी हे कथानक तसे नवीन. भूमिका साकारताना, नवीन कल्पना आत्मसात करण्यासाठी आपण भूतकाळातील अनुभवातून कसे शिकले पाहिजे, याचा संदर्भ मी घेतो. कालबाह्य ज्ञान किंवा विश्वास सोडून दिल्यास आपल्याला नवीन मार्गांनी जुळवून घेण्यास आणि शिकण्याची संधी मिळते, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे माझ्यासाठी टायटल डिस्पॅच हे स्वतःच एक प्रतिबिंब आहे, की जुन्या कल्पनांना सोडून दिल्याने व्यक्तीच्या करिअर आणि आयुष्यात सकारात्मक बदल कसे होतात आणि हेच आमच्या चित्रपटाचे शीर्षक तुम्हा सर्वांना सांगत आहे. कधी कधी एक व्यक्ती म्हणून आपण कोण आहोत ते कळू शकत नाही. अशा वेळेला कन्नूसारखा अभिनेता दिग्दर्शक म्हणून त्याच्या कडून मी खूप काही शिकलो. तो एक कठीण टास्क मास्तर आहे यावर दुमत होणार नाही.
 ‘डिस्पॅच’ मधील भूमिका आव्हानात्मक हाेती काय? तुम्ही भूमिका कशा ​निवडता?
जेव्हा आपण जुन्या मर्यादा तोडतो, तेव्हा नवीन संधी समोरून येतात. असे करताना तुमच्याबरोबर नवीन मर्यादा येतात खऱ्या. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे, ही एक प्रक्रिया आहे, जेथे तुम्हाला तुमचे नवीन व्यक्तिमत्व सापडते. जेणेकरून तुम्हाला चांगली स्क्रिप्ट आणि चांगले दिग्दर्शक मिळू शकतात. मी आयुष्भर हा असाच विचार करत असतो.
तुमच्या भूमिकेबद्दल काही तरी सांगा?
या कथेत, जीवनाच्या दोन्ही पैलूंचे व्यवस्थापन करणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करणारे पात्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक असो. अनेक पत्रकारांनी अनुभवलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब येथे पहायला मिळते. अनेक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट केवळ व्यावसायिक बाजूच दाखवतात. परंतु आम्ही येथे पत्रकारांना करावा लागणारा वैयक्तिक त्याग आणि अडचणी दाखवत आहोत. मला वाटते असे पहिल्यांदाच आपल्याकडे पहायला मिळेल.
ओटीटी, चित्रपट, थिएटर यामधील अभिनयामध्ये काय फरक जाणवतो?
टीव्ही, ओटीटी, थिएटर किंवा चित्रपट असो अभिनेता कसा अभिनय करतो यात खूप सूक्ष्म फरक आहे. समान धागा म्हणजे अभिनेत्याची या सर्व फॉरमॅटमधील कामगिरीवरची निष्ठा ही एकच असते. सामान्यतः नाटक रंगमंचावर प्रेक्षक प्रत्यक्षरित्या कलाकारांबरोबर कनेक्ट होतो.
चित्रपट किंवा ओटीटीमध्ये, अभिनेता कॅमेऱ्याच्या लेन्सद्वारे प्रेक्षकांशी संबंध निर्माण करतो. हि सगळ्यात मोठी शिकवण मला, दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याकडून मिळाली.
शेखर कपूर तुमची प्रेरणा आहेत काय?
होय. एका चित्रीकरणादरम्यान मी शेखर कपूर यांना विचारले, अभिनय करतना कुठे बघू? त्यावेळी ते म्हणाले, नाटक थिएटरमध्ये असताना तुम्ही कुठे पाहता. मग सिनेमात काम करताना, तुम्ही कॅमेरामध्ये पहायचे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी कनेक्ट होता. अभिनेता म्हणून तुम्ही तुमचे काम करा आणि कॅमेरा त्याचे काम करतो. माझ्यासाठी हा सल्ला, माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण ठरला. यामुळे माझी अभिनयाची समज तयार होण्यात मदत झाली. त्यामुळे मी त्यांना माझी प्रेरणा मानतो.
कोरोनाचा चित्रपटसृष्टीवर काय परिणाम झाला?
कोरोनानंतर चित्रपटसृष्टीत कथा,पटकथा, संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या खूप बदल झाले आहेत आजच्या काळात इम्प्रोव्हायझेशनला खूप वेगळे अर्थ प्राप्त झाले आहेत. आता काही लोक कथा आणि कलाकारांची निवड हि चपखल बसेल, अशी करताना दिसतात. मुख्य प्रवाहातील सिनेमात आपण काहीवेळा इतर गोष्टी जोडतो. जेणेकरून आपण इतरांपेक्षा उत्तम होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, माझी भूमिका मला जर ठाऊक असेल, माझ्या पात्राबरोबर जर मी रीलेट करू शकत असेन, तर मी शेवटच्या क्षणी इम्प्रोवाईज केले, तर ते माझ्या भूमिकेनुरूपच होऊन जाईल आणि या कामाच्या पद्धतीवर माझा विश्वास आहे. बऱ्याचदा या सगळ्याचा परिणाम हा दिग्दर्शकांनी आखलेल्या व्हिजनच्या विरोधात देखील जाऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमची व्यक्तिरेखा सोडू नये किंवा दिग्दर्शकाला नाही आवडले तर ते वाक्य परत घेण्याची तयारी देखील तुमच्यात पाहिजे.
अनेक प्रकारच्या भूमिका तुम्ही केल्या. मात्र एक पत्रकाराचीच भूमिका केली नव्हती याबाबत काय सांगाल?
होय, पत्रकाराची भू​मिका करायची राहिली होती, म्हणून मी पत्रकाराची भूमिका स्वीकारली. माझा विश्वास आहे की अभिनेता म्हणून आम्ही नेहमीच अभिनय करत राहतो आणि जेव्हा लोक आमच्या कामाचे कौतुक करतात आणि समर्थन देतात तेव्हा ते खरोखर बळ देणारे असते.
आगामी चित्रपट, मालिका आणि भूमिकांबद्दल विचारल्यावर मनोज वाजपेयी यांनी गप्प राहणे पसंत केले. मनोज वाजपेयी यांनी कोणतीहीं भूमिका निभावली तरी त्याबरोबर प्रेक्षक नक्कीच साधर्म्य साधतील, यावर दुमत नसेल. शिवाय त्यांनी अभिनय केलेला चित्रपट म्हणा किंवा वेब सिरीज असो यात नक्कीच वेगळा विषय असेल, हे काही नव्याने सांगायला नको !

हेही वाचा