पंधरा हुतात्मा सत्याग्रहींच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख !

गोवा मुक्तीदिनानिमित्त बुधवारी मंत्रालयात होणार गौरव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
पंधरा हुतात्मा सत्याग्रहींच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख !

पणजी : गोवामुक्तीसाठी १९५५ ते १९६१ या कालावधीत केलेल्या सत्याग्रहादरम्यान हुतात्मा झालेल्या १५ जणांच्या मुला-मुलींचा राज्य सरकारतर्फे येत्या १८ डिसेंबरला मंत्रालयात प्रत्येकी दहा लाख आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून गोव्याला मुक्त करण्याची हाक देशभरातील सत्याग्रहींनी १५ ऑगस्ट १९५४ रोजी दिली होती. त्यानुसार पीटर आल्वारीस यांनी गोव्यासह देशभरातील सत्याग्रहींनी एकत्र करण्यास सुरुवात केली. या काळात आल्फ्रेड आफोन्सो, अँथनी डिसोझा आणि मार्क फर्नांडिस या तिघांनी पत्रादेवी, पोळे येथे गोवा मुक्तीसाठी सत्याग्रह करण्यास सुरुवात केलेली होती. पण, त्या तिघांनाही पोर्तुगीजांनी अटक केली. 

त्यानंतर गोवा मुक्तीसाठी महाराष्ट्रातील पुणे येथे गोवा विमोचन सहाय्य समितीची स्थापना झाली. या समितीच्या माध्यमातून गोव्यासह विविध राज्यांतील सत्याग्रही एकत्र आले आणि त्यांनी १५ ऑगस्ट १९५५ रोजी गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्याचा निर्धार केला. त्यानुसार सुमारे दहा हजार सत्याग्रहींनी गोव्यात पाऊल ठेवले. परंतु, पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात त्यातील ७४ जण हुतात्मा झाले. या ७४ पैकी १५ जणांना निश्चित करून त्यांच्या मुलांचा ​किंवा मुलींचा येत्या गोवा मुक्तीदिनानिमित्त गौरव करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्यानुसार येत्या १८ डिसेंबरला मंत्रालयातील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात प्रत्येकी दहा लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी​ नमूद केले.

हेही वाचा