सिद्दिकीच्या व्हिडिओने खळबळ आमदारासह पोलिसांवर आरोप
पणजी : पोलिसांनीच मला हुबळी येथे आणले आणि एन्काउंटर करण्याची धमकी देऊन मला सोडले. मला सोडण्यात दहा ते बारा पोलिसांचा सहभाग आहे. मी गोव्यात परत यायला तयार आहे, पण सीबीआयमार्फत प्रकरणाचा तपास व्हायला हवा, अशी मागणी फरार सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने एका व्हिडिओमध्ये केली. त्याने पोलिसांसह एका आमदारावरही आरोप केले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सिद्दिकीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
जमीन हडप प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सिद्दिकी शुक्रवारी पहाटे पोलिसांच्या कोठडीतून फरार झाला होता. त्याला पळून जाण्यास आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित नाईक याने मदत केली होती. अमित नाईक हुबळी पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अमित नाईकला सरकारने सेवेतून बडतर्फ केले आहे.
प्रकरण वाढत असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने काढलेला व्हिडिओ प्रसिद्ध केला.
या घटनेतून राज्यातील पोलीस गुन्हेगारांचे एजंट आणि रक्षक म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली होती.