राज्यात महिन्याला सरासरी १३ टीबीबाधितांचा मृत्यू

राज्यसभेतील माहिती : ६० वर्षांवरील टीबीबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th December, 11:41 pm
राज्यात महिन्याला सरासरी १३ टीबीबाधितांचा मृत्यू

पणजी : राज्यात जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२४  या कालावधीत महिन्याला सरासरी १७२ जणांना क्षयरोग (टीबी) झाला होता. तर या दरम्यान महिन्याला सरासरी १३ टीबी बाधितांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. याविषयी खासदार नीरज शेखर यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.            

लेखी उत्तरानुसार, गोव्यात जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान एकूण २८८ टीबीबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये  १७१ टीबीबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या दहा महिन्यांत टीबीबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ मध्ये ११७ टीबीबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.            

राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०२३ मधील एकूण मृत्यूपैकी ६.७ टक्के हे ० ते १४ वर्षे या वयोगटातील होते. तर १५ ते ३० वर्षे वयोगटातील २.७ टक्के आणि ३१ ते ४५ वर्षे वयोगटातील ५.४ टक्के टीबीबाधितांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ मध्ये ० ते १४ वर्षे या वयोगटातील ४ टक्के, १५ ते ३० वर्षे वयोगटातील १ टक्के, तर ३१ ते ४५ वर्षे वयोगटातील ५.४ टक्के टीबीबाधितांचा मृत्यू झाला होता. वरील कालावधीत ६० वर्षांवरील टीबी बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. 

देशात दीड लाख रुग्णांचा मृत्यू

संपूर्ण देशाचा विचार करता जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान ४७.२१ लाख व्यक्तींना टीबी झाला होता. या दरम्यान एकूण १.५३ लाख टीबी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात टीबीची लागण होण्याचे तसेच बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सर्व राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेशांत ६० वर्षांवरील टीबीबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याचे उत्तरात म्हटले आहे.


हेही वाचा