गोव्यात २० वर्षांवरील मुलांमध्ये मधुमेह राष्ट्रीय प्रमाणाच्या दुप्पट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
गोव्यात २० वर्षांवरील मुलांमध्ये मधुमेह राष्ट्रीय प्रमाणाच्या दुप्पट

पणजी : गोव्यात २० वर्षांवरील वयाच्या मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक २६.४ टक्के आहे. मधुमेहाचा या वयातील राष्ट्रीय दर ११ टक्के आहे. गोमंतकीयांनी मधुमेह आणि स्मृतिभ्रंश यांसारखे आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमॅको) इस्पितळाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित नायक यांनी सांगितले.

गोव्यातील पहिल्या असिस्टेड केअर सेंटरचे (आजी केअर) उद्घाटन गुरुवारी जुने गोवे येथे झाले. उद्घाटनानंतर डॉ. अमित नायक यांनी ‘एजिंग ग्रेसफुली : अनलॉकिंग द सिक्रेट्स टू ब्रेन हेल्थ’ या विषयावर मुख्य भाषणे केले. त्यांनी मधुमेहाबाबत या भाषणात माहिती दिली. प्रसाद भिडे हे ‘आजी केअर’ सेंटरचे संस्थापक आहेत. जुने गोवेतील ‘आजी केअर’ सेंटरमध्ये वृद्ध तसेच आजारी लोकांसाठी निवास आणि उपचार सुविधा उपलब्ध आहे.

संगणकावर जास्त वेळ काम करणे, व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अयोग्य आहार ही स्मृतिभ्रंश किंवा मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. यावर उपाय म्हणजे चालण्यासारखा नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. अमित नायक यांनी सांगितले.

लठ्ठपणा किंवा जास्त वजन असणे, ४५ वर्षांहून अधिक वय असणे, कुटुंबातील सदस्यास टाइप २ मधुमेह असणे, शारीरिक हालचालींचा अभाव, चयापचय बिघडलेले स्टेटोटिक यकृत रोग, तणाव, मागील गर्भधारणेदरम्यान गर्भधारणा मधुमेहाचा इतिहास, पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोमचा इतिहास अशी काही मधुमेह होण्यास कारणे आहेत.