सिद्दिकी सुलेमानला हुबळीतून पलायनास मदत करणाराही ताब्यात!

पोलिसांकडून शोधमोहीम सुरूच; कॉन्स्टेबल अमित नाईक सेवेतून बडतर्फ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th December, 11:53 pm
सिद्दिकी सुलेमानला हुबळीतून पलायनास मदत करणाराही ताब्यात!

पणजी : राज्यातील जमीन घोटाळ्यांतील महाघोटाळेबाज सिद्दिकी सुलेमानला क्राईम ब्रांचच्या कोठडीतून पलायन करण्यास सहकार्य करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अमित नाईक याला गोव्यात आणून सेवेतून बडतर्फ केल्यानंतर, सुलेमानला हुबळीतून कारमधून पळून जाण्यास मदत करणाऱ्या संशयित हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली (३४, रा. हुबळी) यालाही गुन्हे शाखा व जुने गोवे पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सुलेमानने हुबळीतूनही पळ काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांत राज्यात घडलेल्या जमीन हडप प्रकरणांत मास्टर माईंड असलेल्या सिद्दिकी सुलेमान याने कॉन्स्टेबल अमित नाईक याच्या साथीने शुक्रवारी पहाटे कोठडीतून पलायन केल्याची घटना घडल्याने राज्यात खळबळ माजली. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केल्यानंतर गोवा पोलिसांनी तत्काळ सुलेमान आ​णि अमित नाईक यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार क्राईम ब्रांच आणि गोवा पोलिसांनी शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला आणि चार पथके कर्नाटकात पाठवली होती. सुलेमान याला कोठडीतून पळून जाण्यास मदत करणारा कॉन्स्टेबल अमित नाईक शुक्रवारी रात्रीच हुबळी पोलिसांना शरण आला. त्यानंतर गोवा पोलिसांनी गोव्यात आणल्यानंतर नाईक याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांकडून अमित नाईक याची चौकशी सुरू असतानाच, सिद्दिकी सुलेमानला हुबळीतून कारमधून पळून जाण्यास मदत करणाऱ्या हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली यालाही गुन्हे शाखा व जुने गोवे पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सुलेमानने हुबळीतूनही पळ काढल्याचे सिद्ध झाले आहे. हजरत अली याला गोव्यात आणले जाणार असून, त्याच्या चौकशीतूनच सुलेमानने नेमके कुठे पलायन केले आहे​, याची माहिती पोलिसांना मिळणार आहे.


...अन् अमित नाईक सुलेमानच्या जाळ्यात अडकला!
- जमीन हडप प्रकरणांत सिद्दिकी सुलेमानला गेल्या १२ नोव्हेंबरला हुबळी येथे अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने आपल्याला सोडण्यासाठी पोलिसांना कोट्यवधी रुपये देण्याचे​ आमिष दाखवलेले होते. परंतु, पोलिसांनी त्याचे आमिष धुडकावत त्याला अटक करून गोव्यात आणले होते.
- क्राईम ब्रांचच्या कोठडीत असताना सुलेमान वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुटकेसाठी पैशांचे आमिष दाखवत होता. पण, त्याच्या आमिषाकडे इतरांनी पाठ फिरवल्यानंतर कॉन्स्टेबल अमित नाईक त्याच्या जाळ्यात अडकला.
- सुलेमानला कोठडीतून बाहेर काढून पलायन करण्यापूर्वी अमित नाईक याने प्रत्येक दिवशी रात्रीच्या वेळी गार्डची ड्युटी मागून घेतली होती. सिद्दिकी सुलेमान हा अमित याच्याच मोबाईलवरून आपल्या साथीदारांशी संपर्क करत होता, असे पोलीस तपासातून उघड झाले आहे.
- सिद्दिकी सुलेमान याने अमित नाईक याला पत्नीशी घटस्फोट प्रकरणात तसेच इतर मदतीची हमी देत कर्नाटकात नेऊन सोडण्याची हमी दिलेली होती. त्यानुसारच, अमित नाईकने त्याला कोठडीतून बाहेर काढून हुबळीपर्यंत पोहोचवल्याची माहिती सूत्रांनी दिली.             

हेही वाचा