४.४५ किमीचा सहापदरी उड्डाणपूलही राहणार उभा
पणजी : राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील मडगाव बायपास ते कुंकळ्ळी दरम्यानच्या ७.२४ किमी लांबी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने ७४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. या मार्गावर ४.४५ किमी लांबीचा सहापदरी उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या दहा वर्षांत राज्यातील रस्ते, महामार्गांबाबतच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिलेला आहे. यासाठी त्यांनी कोट्यवधींचा निधी गोव्याला दिलेला आहे. त्यातून अटलसेतू, झुआरी पूल आदींसारखे अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत.
काहीच दिवसांपूर्वी गडकरी यांनी बेंदोर्डे ते पोळे या काणकोण बायपासला जोडणाऱ्या २२.१० किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १,३७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला होता. त्यानंतर आता मडगाव बायपास ते कुंकळ्ळीपर्यंतच्या मार्गाच्या विकासासाठी ७४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
मडगाव बायपास ते कुंकळ्ळी हा सासष्टी तालुक्यातील भाग मुंबई-कन्याकुमारी ४/६-लेन कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग बनत आहे. त्यामुळे या मार्गाचा विकास झाल्यास आणि उड्डाणपूल आल्यास या भागांतील वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणणे तसेच वाहन चालकांचा वेळ वाचवण्यास मोठी मदत मिळणार आहे.
तानावडेंकडून मोदी, शहा, गडकरींचे आभार
मडगाव बायपास ते कुंकळ्ळी दरम्यानच्या मार्गासाठी केंद्र सरकारने ७४७ कोटींचा निधी मंजूर केल्याबाबत राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. केंद्रातील भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली गोव्याने गेल्या दहा वर्षांत अभूतपूर्व प्रगती पाहिली आहे. गोव्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र सरकारकडून नेहमीच प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.