सॅन फ्रान्सिस्को येथे अखेरचा श्वास घेतला.
सॅन फ्रान्सिस्को : प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचे रविवारी, १५ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त झाकीर हुसेन यांना तीन वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
झाकीर हुसेन यांनी 'हीट अँड डस्ट' आणि 'इन कस्टडी' सारखे नावाजलेले चित्रपट तसेच आंतरराष्ट्रीय बॅले आणि ऑर्केस्ट्रल प्रॉडक्शन्ससाठी संगीत दिले. झाकीर हुसेन यांना तीन वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.
झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला . त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीरचे वडील अल्ला राखा हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी घेतली. झाकीर हुसेन यांनी वयाच्या ११ व्या वर्षी अमेरिकेत त्यांची पहिली मैफल सादर केली . १९७३ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' लाँच केला.